Gashmeer Mahajani Son Munj: अभिनेता गश्मीर महाजनी नुकताच ‘देऊळ बंद २’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याला या सिनेमात पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला. सोशल मीडियावर व्हिडीओ, पोस्ट शेअर करीत त्याचे कौतुक केले. गश्मीर त्याच्या प्रत्येक भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकतो. त्याला नवनवीन भूमिकांमध्ये पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

गश्मीर अनेकदा सोशल मीडियावर फोटो, रील्स, व्हिडीओ शेअर करतो. तसेच, अनेकदा त्याच्या चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो. चाहते त्याला अनेकविध प्रश्न विचारतात. तो कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, तो कोणती पुस्तके वाटतो, तो मानसिक स्वास्थ जपण्यासाठी काय करतो, तो त्याच्या मुलाबरोबर कसा वेळ घालवतो, त्याच्या आवडत्या जागा कोणत्या, फिटनेसासाठी काय करतो हे आणि असे अनेक प्रश्न चाहते गश्मीरला विचारत असतात. गश्मीरसुद्धा त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत असतो. अनेकदा तो त्याच्या कुटुंबाबरोबरचे खास फोटोही शेअर करतो. मुलाखतींमध्येसुद्धा तो त्याचा मुलगा युग, पत्नी, आईबद्दल बोलतो. त्याबरोबरच वडिलांच्या चित्रपटांबद्दलही तो बोलतो.

गश्मीर महाजनीच्या मुलाची पार पडली मुंज

आता मात्र गश्मीर एका व्हिडीओमुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्री प्राजक्ता माळीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये गश्मीर व त्याचा मुलगा व्योम हे पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. गश्मीरच्या मुलाच्या मुंजीचा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने गश्मीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिने लिहिले की, शास्त्रीबुवा वाढदिवसाच्या शुभेच्छा. तसेच, तिने असेही लिहिले की, शास्त्रीबुवा हे छोट्या शास्त्रीबुवांबरोबर आहेत. त्याबरोबरच मुंज असेही लिहिले. दोन दिवसांपूर्वी व्योमची मुंज झाल्याचे तिने लिहिले आहे.

दुसऱ्या एका फोटोत तिच्यासह व्योम, भूषण प्रधान, अभिजीत खांडकेकर, पूजा सावंत, सुखदा खांडकेकर, गश्मीरची आई, पत्नी असे अनेक जण दिसत आहे. या फोटोवर प्राजक्ताने ६ जून असे लिहिले आहे.

गश्मीर महाजनी व प्राजक्ता माळीने फुलवंती या सिनेमात एकत्र काम केले आहे. व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्री ही भूमिका त्याने साकारली होती. हा सिनेमा २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तसेच, आता सिनेमा हिंदी भाषेतही उपलब्ध आहे. गश्मीर व प्राजक्ताची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना इतकी आवडली की, ते या दोघांना तुम्ही पुन्हा एकत्र कधी दिसणार, असे सतत विचारताना दिसतात.

दरम्यान, आगामी काळात हे कलाकार कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.