Gautami Patil visited Ujjain Mahakal : दमदार नृत्यशैलीमुळे प्रचंड लोकप्रिय झालेली नृत्यांगना गौतमी पाटील ही लवकरच ‘महाराष्ट्र फाइल्स’ चित्रपटामध्ये झळकणार आहे. एकीकडे ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असताना, दुसरीकडे तिने १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा सुरू केल्याची चर्चा आहे. गौतमी पाटील हिने उज्जैन यात्रा केली असून, तिने महाकालेश्वराचे दर्शन घेतले आहे. याआधी तिने नाशिकमधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगालाही भेट दिली होती. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यामुळे ग्लॅमरस व प्रसिद्धीच्या दुनियेपासून थोडे लांब जाऊन गौतमी पाटील ही भक्तीमध्ये तल्लीन झाल्याचे दिसून येत आहे.

नृत्यांगना गौतमी पाटील हिने इन्स्टाग्रामवर उज्जैन येथील तिच्या महाकाल दर्शनाचा व्हिडीओ शेअर केला आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वराचे तिने भक्तिभावाने दर्शन घेतले. मंदिराच्या परिसरातील रील तिने शेअर केली आहे. त्यामध्ये गौतमी पाटीलने कपाळावर महाकालचा तिलक लावला असून, तिचा हा साधा आणि पारंपरिक अंदाज चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. यावेळी तिने लाल रंगाची आकर्षक साडी परिधान केली होती; तर मोकळ्या केसांमुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली होती. महाकाल दर्शनानंतर गौतमीने ‘जय महाकाल’ अशी कॅप्शन देत रील सोशल मीडियावर शेअर केली आहे.

नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिराचे घेतले दर्शन

चार दिवसांपूर्वी गौतमी पाटीलने नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरातील दर्शनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर महादेवाचे तिने भक्तिभावाने दर्शन घेतले. मंदिर परिसरात विशेष पूजा करीत तिने ‘हर हर महादेव’, अशी कॅप्शन देत दर्शनाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले होते. यावेळी पांढऱ्या आणि जांभळ्या रंगाच्या बनारसी साडीत, नथीने सजलेला तिचा पारंपरिक लूक विशेष लक्षवेधी ठरला होता.

नर्मदा नदीमध्ये केली रील शूट

त्याचबरोबर गौतमी पाटील हिने मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे. तिने नर्मदा नदीमध्ये रील शूट केली होती. गौतमीने तिच्या हिल हिल पोरी हिला या नवीन गाण्यासह बोटीतील व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये मागे ओंकारेश्वराचे मंदिर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गौतमीच्या आध्यात्मिक प्रवासाची चाहत्यांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे. गौतमी पाटील हिने १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा सुरू केल्याचा अंदाज लावला जात आहे.

गौतमी पाटील व भाऊ कदम यांचे नवे गाणे रिलीज

दादा कोंडके यांच्या ‘आंधळा मारतो डोळा’ चित्रपटातील ‘हिल हिल पोरी हिला…’ गाण्याचे नवीन व्हर्जन रिलीज झाले आहे. त्यामध्ये प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील आणि लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम यांची जोडी पहिल्यांदाच एकत्र झळकली आहे. या दोघांचा अनोखा अंदाज या म्युझिक व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. गायक रोहित राऊत आणि गायिका सोनाली सोनावणे यांच्या सुमधुर आवाजात हिल हिल पोरी हिला… हे गाणे नव्याने संगीतबद्ध करण्यात आले आहे.