Geetanjali Kulkarni and Parna Pethe on not to have child: गीतांजली कुलकर्णी यांनी आजवर अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केले आहे. ‘सर’, ‘गुल्लक’, ‘कोर्ट’, ‘लंपन’ अशा अनेक चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

सध्या त्या ‘करुणाष्टके’ या नाटकामुळे चर्चेत आहेत. प्राजक्त देशमुखने हे नाटक लिहिले आहे. या नाटकाच्या निमित्तानं गीतांजली कुलकर्णी यांनी अनेक वर्षांनी मराठी रंगभूमीवर पुनरागमन केले आहे. गीतांजली कुलकर्णी यांच्यासह या नाटकात अभिनेत्री पर्ण पेठे, केतकी सराफ, माधुरी भारती, किरण खोजे, प्रतीक्षा खासनीस यांच्याही या नाटकात भूमिका आहेत.

गीतांजली कुलकर्णी आणि पर्ण पेठे यांनी नुकतीच आरपार या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना विचारले की, आपलं कुटुंब वाढवावं किंवा आपल्या पुढच्या पिढीचा विचार करावा, असा विचार तुम्ही दोघींनी केला नाही का? अजून काही वर्षांनी आपला हा निर्णय चुकला असं तुम्हाला वाटेल का?

गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या….

या प्रश्नाचे उत्तर देताना गीतांजली कुलकर्णी म्हणाल्या, “जेव्हा एकतिसाव्या वर्षी मी निर्णय घेतला, तेव्हा या गोष्टीची भीती वाटत होती, पण आज मला या गोष्टीचं अजिबातच वाईट वाटत नाही.”

पुढे त्या म्हणाल्या, “मला असं वाटलं की, माझ्या त्या निर्णयामुळे मला खूप वेगवेगळ्या गोष्टी करता आल्या. नैसर्गिकरित्या जर तुमचं मूल असेल तर तुम्हाला त्यांच्यावर लक्ष द्यायला लागतं. पण, मी अजून माझ्या मित्र-मैत्रिणींच्या मुलांना किंवा मी ज्या गावात काम करते, त्यांना मी मदत करू शकते, कारण मला तो वेळ आहे; त्यामुळे पालनपोषण करण्याचा आनंद आहे, तो मला मिळतोय. मी खूप आनंदी आहे. “

पर्ण पेठे काय म्हणाली?

पर्ण पेठे म्हणाली, “याबाबतीत माझी ठाम मतं नाहीत, कारण मी अशा वयात आहे, जिथे मला त्याची अजून स्पष्टता आली नाही. मला मुलं प्रचंड आवडतात आणि जर मूल होण्याचा निर्णय आमच्याकडून घेतला गेला तर ते सगळं मी खूप प्रेमानं आणि छान करेन असंच मला वाटतं.”

ती पुढे म्हणाली, “आतापर्यंत तो निर्णय नाही घेतला, त्याची काही कारणं आहेत. पण, मला असं वाटतं की माझं असं त्याबद्दल ठाम मत नाहीये. पण, लहान मुलं प्रचंड आवडतात म्हणून मी लहान मुलांबरोबर कामही करते.स्वत:चंच मूल असलं पाहिजे की नाही, याबद्दल जी काही सगळी मत मतांतर आहेत, त्याबद्दल मी विचार करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, त्याबद्दल माझं असं ठोस मत नाहीये.”