Genelia Deshmukh Birthday Wish Post For Son : रितेश व जिनिलीया देशमुख यांची जोडी मराठीसह हिंदी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. चाहते त्यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडपं म्हणून पाहतात. सोशल मीडियावर दोघंही कायम सक्रिय असतात. रितेश-जिनिलीया त्यांचे फोटो, कुटुंबीयांचे मजेशीर व्हिडीओ, डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असतात. आज जिनिलीयाने तिच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीसाठी पोस्ट शेअर केली आहे. ती व्यक्ती म्हणजे तिचा धाकटा मुलगा राहील. आज ( १ जून ) रितेश- जिनिलीयाचा धाकटा मुलगा राहीलचा १०वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जिनिलीयाने खास पोस्ट लिहिली आहे.
राहीलचा जन्म २०१६ मध्ये झाला. आज त्याचा दहावा वाढदिवस आहे, यानिमित्ताने जिनिलीयाने खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कधीच…कशासाठीही आणि कोणत्याच परिस्थितीत तू स्वत:ला बदलू नकोस…असा सल्ला अभिनेत्रीने आपल्या लाडक्या लेकाला दिला आहे. राहीलला फुटबॉलची प्रचंड आवड आहे…त्यामुळे वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीने राहीलचे फुटबॉल जर्सीतील फोटो शेअर केले आहेत.
जिनिलीया लिहिते, “राहील, तुझ्यामध्ये नक्कीच काहीतरी खास आहे. यामुळेच तुझी आई म्हणून…जेव्हा मी तुझ्याकडे पाहते, तेव्हा मला तुझ्यासारखंच व्हावंसं वाटतं. मनसोक्त आयुष्य जगणारा, एक स्ट्राँग लीडर, निर्भय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा…! राहील, कधीच…कशासाठीही आणि कोणत्याच परिस्थितीत तू स्वत:ला बदलू नकोस! असाच कायम आनंदी राहा..तुझी चाहती…तुझीच आई!”
रितेश लेकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना म्हणतो, “रायो…आय लव्ह यू! तू खरंच खूप हुशार आणि आमचा Incredible Boy आहेस. तू आता हळुहळू मोठा होत आहेस पण मला आशा आहे की, तुझ्यातलं बालपण, तुझी मोहकता तू सदैव जपशील. My Son…तुला १० व्या वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!”
दरम्यान, जिनिलीयाच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी राहीलच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. नुकतंच राहीलने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. ‘राजा शिवाजी’ सिनेमात रितेशच्या रियान व राहील या दोन्ही मुलांनी बाळ शिवरायांच्या भूमिका साकारल्या आहेत.
