Genelia Deshmukh Birthday : मनोरंजन विश्वामध्ये दमदार अभिनयाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारी अभिनेत्री जिनिलीया देशमुख आज (दि.०५) तिचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. जिनिलीयावर सिनेविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत असून अनेक कलाकारांनी तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्रीने जिनिलीयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर भाग्यश्रीने पोस्ट शेअर करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वाढदिवसानिमित्त भाग्यश्रीने इन्स्टाग्रामवर जिनिलीया व रितेश देशमुख यांचा डान्स करत असलेला व्हिडीओ शेअर केला आहे. ‘राजा शिवाजी’ चित्रपटामध्ये या तिन्ही कलाकारांनी एकत्र काम केले होते. या सिनेमाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आयोजित करण्यात आलेल्या पार्टीतील व्हिडीओ भाग्यश्रीने शेअर केला आहे. यामध्ये भाग्यश्री ही देशमुख दाम्पत्यासह आनंदाने डान्स करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओमध्ये जिनिलीया हलक्या-फुलक्या अंदाजात खास डान्स करताना दिसून येत आहे.
भाग्यश्रीने जिनिलीयाला दिल्या शुभेच्छा
जिनिलीयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा व्हिडीओ पोस्ट करत भाग्यश्रीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलं, “सर्वात गोड, प्रेमळ, कायम आनंदी आणि माझी लाडकी जिनिलीया, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. प्रत्येक वेळी तुझ्याकडे पाहिल्यावर मला समजतं की रितेश रोज पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमात का पडतो. देव तुला नेहमी आनंदी आणि सुखी ठेवो,” अशा आशयच्या कॅप्शनसह भाग्यश्रीने जिनिलीयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रेड हार्ट इमोजीसह भाग्यश्रीने या जोडप्यावरील प्रेम व्यक्त केले आहे.
जिनिलीयाने दिली प्रतिक्रिया
भाग्यश्रीच्या या पोस्टवर जिनिलीयाने कमेंट करत तिचे आभार मानले आहेत. “मॅम, खूप खूप धन्यवाद, तुम्ही खूप भारी आहात.” त्यासह तिने इमोजी कमेंट केल्या आहेत. अभिनेत्री भाग्यश्रीच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर नेटकऱ्यांनी जिनिलीयाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जिनिलीयाच्या चाहत्यांनी तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केले आहे.
‘राजा शिवाजी’ सिनेमामध्ये केले एकत्र काम
दरम्यान, भाग्यश्रीने रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटामध्ये राजमाता जिजाऊंची भूमिका साकारली होती. याच चित्रपटामध्ये रितेश देशमुखने छत्रपती शिवाजी महाराज आणि जिनिलीयाने महाराणी सईबाईंची भूमिका साकारली होती. यातील भाग्यश्रीच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली. विक्रमी कोट्यवधी रुपयांची कमाई करणाऱ्या या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले होते. यानंतर आता भाग्यश्रीने जिनिलीयाच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केली आहे.
