Genelia & Riteish Deshmukh : ‘राजा शिवाजी’ सिनेमाला मिळणाऱ्या भरघोस यशामुळे सध्या सर्वत्र रितेश-जिनिलीयाचं भरभरून कौतुक करण्यात येत आहे. या दोघांकडे बॉलीवूडची ‘आदर्श’ जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांची पहिली भेट २००२ मध्ये ‘तुझे मेरी कसम’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झाली होती. जवळपास नऊ ते दहा वर्षे एकमेकांना डेट केल्यावर या दोघांनी २०१२ मध्ये थाटामाटात लग्न केलं. पण, विवाहसोहळा पार पडण्याआधी जिनिलीयाने रितेशसमोर एक अट ठेवली होती.

२००२ ते २०१२ या डेटिंगच्या काळात रितेश-जिनिलीयाने एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं. रितेश देशमुख याबद्दल ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतो, “आमचं लग्न ठरलं… सगळ्या गोष्टी अगदी आम्हाला हव्या तशा होणार होत्या. तेव्हा जिनिलीया मला म्हणाली, जोपर्यंत तू मला जाहीरपणे प्रपोज करणार नाही… तोपर्यंत मी लग्नाच्या मंडपात येणार नाही.”

जिनिलीया यावर म्हणते, “आम्ही दोघंही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो, रिलेशनशिपची सुरुवात कशी झाली हे आम्हाला समजलंच नाही. आम्ही एकमेकांना लग्नासाठी किंवा डेटिंगसाठी विचारलं नव्हतं. आता मला माझ्या मुलांना लव्हस्टोरीबद्दल, प्रपोजलबद्दल सांगायला काहीतरी हवं ना…म्हणून रितेशने मला लग्नाची मागणी घालावी असं मला मनापासून वाटत होतं.”

रितेश पुढे सांगतो, “मग मी लग्नाला पाच दिवस बाकी राहिलेले असताना एक प्लॅन बनवला. मी हिला सांगितलं की, आपण दोघंही ताज हॉटेलमध्ये जेवायला जाऊ…छान तयार होऊन ये. जर व्यवस्थित तयारी करून ये..ट्रॅक पँट वगैरे घालून येऊ नकोस. जिनिलीया पूर्णपणे गोंधळलेली होती… मी अचानक का असं म्हणतोय… याची तिला काहीच कल्पना नव्हती. मग मी तिला ‘गेटवे ऑफ इंडिया’जवळ नेलं. तिथे माझ्या मित्राची बोट ( Yacht ) होती…त्यात आम्ही बसलो, आणि पुढे मरीन ड्राईव्ह परिसरात फेरफटका मारण्यासाठी निघालो. ती सूर्यास्ताची वेळ होती. मी बोटीवरच तिच्या आवडीचा पिझ्झा ऑर्डर करून ठेवला होता.”

“मरीन ड्राईव्ह आल्यावर मी माझ्या एका मित्राला मेसेज केला. तो त्याच परिसरात राहत होता. ठरवल्याप्रमाणे मी माझ्या मित्राला ‘ओके’ असा मेसेज केला. त्यानंतर त्या मित्राने त्याच्या घराच्या टेरेसवर पुष्पवृष्टी व फटाक्यांची आतिषबाजी केली. त्यात ‘Will You Marry’ असा संदेश लिहिण्यात आला होता. मी जिनिलीयाला सांगितलं की, ‘हे सगळं तुझ्यासाठी, माझ्याशी लग्न करशील का?”

जिनिलीया यावर म्हणाली, “हे सगळं पाहून मी भारावून गेले होते…अगदी थक्क झाले होते. माझा आनंद गगनात मावेनासा झाला होता…हे किती गोड आहे, अशी भावना मनात होती. तो दिवस खूप सुंदर होता. “

रितेश व जिनिलीया देशमुख यांनी ३ फेब्रुवारी २०१२ रोजी लग्न केलं. या जोडप्याला रियान व राहील अशी दोन मुलं आहेत. या दोघांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटातून सिनेविश्वात पदार्पण केलं आहे.