हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. मराठी मनोरंजनसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी १९ मार्चला मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला गेला. या शुभदिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्राचं लाडकं कुटुंब म्हणजेच देशमुख कुटुंबीय सुद्धा प्रत्येक मराठी सणवार मोठ्या उत्साहाने साजरे करतात. रितेश व जिनिलीया देशमुख यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देशमुखांच्या घरचा गुढीपाडवा कसा असतो याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली आहे.

देशमुखांच्या घरी गुढीपाडव्यानिमित्त खास पदार्थ बनवले जातात. याबद्दलचा खुलासा जिनिलीयाने मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

जिनिलीया म्हणाली, “गुढीपाडव्याच्या दिवशी आमच्या घरी खूपच चविष्ट जेवण बनवलं जातं. आम्ही पारंपरिक महाराष्ट्रीयन थाळी बनवतो. ज्यात चार ते पाच प्रकारच्या चटण्या असतात. त्याशिवाय जेवण पूर्ण होत नाही… आंब्याची चटणी, नारळाची चटणी, शेंगदाणा चटणी, ठेचा, वांग्याची भाजी, बटाट्याची भाजी आणि अर्थात पुरणपोळी असे सगळे पदार्थ गुढीपाडव्याला आमच्या घरी बनवले जातात.”

Award Banner

पुढे रितेश म्हणाला, “अनेकदा गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही आवर्जून उकडीचे मोदक सुद्धा बनवतो. मला माहितीये खरंतर मोदक गणपती बाप्पाला आवडत असल्याने ते गणेश चतुर्थीला बनवले जातात. पण, आमच्या घरी उकडीचे मोदक सर्वांना इतके आवडतात…. म्हणून सणासुदीला आम्ही मोदक बनवतो.”

लग्नानंतर मराठमोळी संस्कृती अनुभवायला मिळाली याबद्दल जिनिलीया सांगते, “२०१२ मध्ये आमचं लग्न झालं आणि त्यानंतर मला मराठी सण, आपली परंपरा याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी समजल्या. आता आम्ही घरी प्रत्येक सण आनंदाने साजरा करतो. रितेश आमच्या मुलांना देखील प्रत्येक सणाचं महत्त्व, हे सण आपण का साजरे केले पाहिजेत याची माहिती देत असतो. त्यामुळे आता आमची मुलं सुद्धा आवडीने सगळे सण साजरे करतात.”

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर नुकताच त्यांच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट १ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रितेश-जिनिलीयासह संजय दत्त, अभिषेक बच्चन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते अशा दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.