Raja Shivaji Movie Trailer Launch : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमा येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा पहिला टीझर ‘धुरंधर २’च्या स्क्रिनिंगदरम्यान प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र, आता ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच दणक्यात पार पडला आहे. या कार्यक्रमाला सिनेमाची संपूर्ण स्टारकास्टने उपस्थिती लावली होती.
रितेश देशमुखची पत्नी अभिनेत्री व निर्माती जिनिलीया देशमुख या सिनेमात सईबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणार आहे. ट्रेलर लॉन्च सोहळ्यासाठी जिनिलीयाने मराठमोळा पारंपरिक लूक केला होता. गुलाबी रंगाची नऊवारी साडी, गळ्यात हार, नाकात नथ, केसात गजरा, कपाळी चंद्रकोर या लूकमध्ये जिनिलीया अगदी सुंदर दिसत होती. जिनिलीयाची एन्ट्री होताच सगळेजण “वहिनी…वहिनी” म्हणून तिला हाक मारू लागले यावेळी जिनिलीयाने अगदी प्रेमाने “आता नको नंतर फोटो काढू” असं सर्वांना सांगितलं.
यानंतर ‘राजा शिवाजी’ सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट माध्यमांशी संवाद साधण्याकरता मंचावर पोहोचली. यावेळी जिनिलीया खालीच उभी होती. पत्नीला पाहून रितेश घाईत तिच्याजवळ पोहोचला आणि जिनिलीयाचा हात धरून रितेशने तिला रंगमंचावर नेलं. दोघांचा हा गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
जिनिलीया व रितेश यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ‘राजा शिवाजी’ सिनेमासाठी रितेशने प्रचंड मेहनत घेतली आहे. गेल्या १० वर्षांपासून तो यावर अभ्यास करतोय. तर, जिनिलीया या सिनेमाची निर्माती आहे.
रितेश-जिनिलीयासह ‘राजा शिवाजी’ चित्रपटात दमदार स्टारकास्ट आहे. संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते असे लोकप्रिय कलाकार या सिनेमात एकत्र झळकणार आहेत.
दरम्यान, ‘जिओ स्टुडिओज’ प्रस्तुत आणि ‘मुंबई फिल्म कंपनी’ निर्मित, ज्योती देशपांडे व जिनिलीया देशमुख निर्मित ‘राजा शिवाजी’ हा भव्य ऐतिहासिक चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
