मराठी, हिंदी आणि हॉलीवूडमधील बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झालेले असतानाही ‘घबाडकुंड’ने प्रेक्षकांची पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे. थरार आणि रहस्याचा अनोखा अनुभव देणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुलचे फलक झळकताना दिसत आहेत. ‘राजा शिवाजी’, ‘तुंबाडची मंजुळा’, ‘देऊळ बंद २’, या मराठी चित्रपटांसह बॉलीवूडमध्ये ‘कॉकटेल २’, ‘में वापस आऊंगा’, ‘वेलकम टू द जंगल’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही ‘घबाडकुंड’ने आपल्या वेगळ्या आशयाच्या जोरावर प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८.१० कोटींची कमाई करत यशाची नवी उंची गाठली असून, आता तिसऱ्या आठवड्यातही दिमाखदार वाटचाल सुरू ठेवली आहे. मराठी, हिंदी आणि हॉलीवूडमधील मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा असतानाही ‘घबाडकुंड’ने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं असून, तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटावरील प्रेक्षकांचं प्रेम कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

चित्रपटातील लेखन, दिग्दर्शन, दमदार कलाकारांचा अभिनय, प्रभावी संवाद, पार्श्वसंगीत, तांत्रिक मांडणी आणि उत्कंठावर्धक सादरीकरण या सर्वच बाबींचे प्रेक्षकांकडून भरभरून कौतुक होत आहे. त्यामुळे ‘घबाडकुंड’ची चर्चा सोशल मीडियासह सर्वत्र रंगताना दिसत आहे. पहिल्या आठवड्यापासून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे अनेक चित्रपटगृहांमध्ये शोची संख्या वाढवण्यात आली असून, अनेक ठिकाणी प्रेक्षकांनी आगाऊ बुकिंगलाही मोठा प्रतिसाद दिला आहे.

देवदत्त नागे, कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, स्मिता पायगुडे-अंजुटे, वैष्णवी कल्याणकर, रॉकी देशमुख, आरोही भोईर, योगेश प्रकाश तनपुरे, साहिल अनलदेवर आदी कलाकारांची दमदार फौज ‘घबाडकुंड’ चित्रपटात आहे.

Ghabadkund Box Office Collection
‘घबाडकुंड’ सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

दरम्यान, ‘घबाडकुंड’ सिनेमा १९ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘आयकॉन द स्टाईल’चे निर्माते डॉ. रसिक कदम निर्मित आणि प्रीतम एस. के. पाटील दिग्दर्शित ‘घबाडकुंड’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही ‘घबाडकुंड’ची यशस्वी घोडदौड कायम राहणार असल्याचा विश्वास चित्रपटाच्या संपूर्ण टीमने व्यक्त केला आहे.