मराठी अभिनेत्री गिरिजा ओक आता ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. आजवर गिरिजाने मराठीसह अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, गिरिजा एवढी लोकप्रिय असूनही अनेकदा चाहते तिला वेगळ्याच अभिनेत्रींच्या नावाने हाक मारतात. नुकत्याच एका पत्रकार परिषदेदरम्यान एकाने गिरिजाला स्पृहा जोशी म्हणून हाक मारली होती. या भन्नाट प्रसंगांबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपलं मत व्यक्त केलं आहे.
गिरिजा अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “हो…असं होतं. अगदी परवाच मला एकाने खूप उत्सुकतेने श्रुती मराठे म्हणून हाक मारली. श्रुती खूप सुंदर दिसते…आणि खरं सांगते मला ती प्रचंड आवडते. ती फारच सुंदर दिसते. आमच्यात काहीच साम्य नाहीये. तरी त्यांनी मला का श्रुती म्हणून हाक मारली मला समजलं नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “बरं त्यानंतर मला कुणीतरी विचारलं…तूच ‘तिघी’ सिनेमात आहेस ना? याचा अर्थ त्यांना मी नेहा पेंडसे वाटले, आणि आता स्पृहाबद्दल सांगायचं झालं तर, अनेक लोक मला तिच्या नावाने हाक मारतात. मी आणि स्पृहाने आता करारच केलाय. आम्हाला नेहमीच एकमेकींच्या नावाने हाक मारतात. जर आता कुणी आम्हाला एकमेकींच्या नावाने हाक मारली तर…आम्ही सांगतच नाही आम्ही कोण आहोत. आता त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या रिपोर्टरनेच मला स्पृहा म्हटलं…तो व्हिडीओ व्हायरल झाल्यावर परत लोक कमेंट करणार, त्यापेक्षा मी स्वत: तिला सांगितलं की मी स्पृहा नाही गिरिजा आहे.”
“पण, या व्यतिरिक्त जर कुणी प्रेक्षक मला भेटले आणि त्यांनी स्पृहा म्हणून हाक मारली…तर मी फोटो देऊन टाकते. मी त्यांना माझी ओळख सांगत नाही. अगदी असंच सेम स्पृहा सुद्धा करते. मला स्पृहाने मध्ये फोन केला होता तेव्हा ती म्हणाली, ‘अगं मी फ्लाइटने प्रवास करत होते तेव्हा एक काका भेटले, ते म्हणाले आम्हाला वाटलं नव्हतं तुम्ही शाहरुख खानबरोबर काम केल्यावर साध्या इकोनॉमीमध्ये प्रवास कराल.’ तर स्पृहा मला म्हणाली मला समजलंच नाही मला काय करावं आणि मी त्या काकांना सांगितलंच नाही की, मी गिरिजा नाहीये.”
“प्रसाद ओक तुमचे काका ना?”
“एका काकांना मध्ये मी सांगितलं होतं ‘मी स्पृहा नाहीये’ तर ते माझ्यावर चिडले होते. तुम्ही प्रेक्षकांमुळेच लोकप्रिय होतात मग…फोटो मागितला की सांगता मी स्पृहा नाहीये….असंही माझ्याबरोबर खरी ओळख सांगितल्यावर घडलं होतं. एवढंच नव्हे तर, प्रसाद ओक तुमचे काका ना? असाही प्रश्न मला विचारला होता… असे अनेक लोक मला भेटत असतात. खरं सांगू तर मलाही प्रेक्षकांना भेटायला आवडतं. फार भाबड्या मनाने ते स्वत:चं मत सांगतात मला ते आवडतं. आता स्पृहा आणि माझ्यातही काहीच साम्य नाहीये…पण, आता लोकांना वाटतंय तर चांगलंय.” असं मत यावेळी गिरिजाने व्यक्त केलं.
