Girija Oak Godbole son Kabir 13th birthday: अभिनेत्री गिरिजा ओक गोडबोले ही सध्या चर्चेत आहे. तिला मिळालेला नॅशनल क्रश हा टॅग, त्यानंतर तिच्या आयुष्यात झालेला बदल, तिच्या घरच्यांची त्यावर काय प्रतिक्रिया आहे या सगळ्याचीच मोठ्या प्रमाणात चर्चा होत असल्याचे पाहायला मिळते. त्याबरोबरच गिरिजाने विविध मुलाखतींत केलेली वक्तव्येही कायमच चर्चेत असलेली पाहायला मिळतात.
गिरिजा मुलाखतींमध्ये तिच्या कुटुंबाबद्दलही बोलते. तिचा नवरा सुहृद गोडबोले, सासू-सासरे, नणंद, मुलगा कबीर या सगळ्यांबद्दल अभिनेत्री वेळोवेळी बोलते. त्यांच्याबरोबरचे गोड क्षण, आठवणी ती सांगते. आज गिरिजा व सुहृद यांच्या मुलाचा कबीरचा १३ वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
सृहृद गोडबोले पोस्ट शेअर करत म्हणाले…
सृहृद गोडबोले यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी गिरिजालाही टॅग केले आहे. त्यांनी काही व्हिडीओ शेअर केले आहेत. हे व्हिडीओ कबीर एक वर्षाचा होता, तेव्हापासूनचे आहेत. त्यामुळे १३ वर्षांचे १३ व्हिडीओ पाहायला मिळत आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये कबीर अगदी लहान असून, त्याने कानाला फोन लावल्याचे दिसत आहे. दुसऱ्या व्हिडीओत त्याला ‘बाय’, असे म्हटल्यानंतर तो ‘नाही’ असे म्हणताना दिसत आहे. हा क्यूट व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तिसऱ्या व्हिडीओत तो मुद्दाम गादीवर पडत असून, चौथ्या व्हिडीओत तो गाणे गात असल्याचे दिसत आहे. पाचव्या व्हिडीओत तो त्याचाच फोटो पाहतो आणि तसेच हसून दाखवत म्हणतो की, सेम स्माईल आहे. सहाव्या व्हिडीओत त्याचा दात पडल्याचे आणि सातव्या व्हिडीओत त्याने फुटबॉलपटू मेस्सीसाठी चित्र काढल्याचे पाहायला मिळत आहे. आठव्या व्हिडीओत तो पियानो वाजवतो आहे.
पुढे काही मजेशीर व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. त्यानंतर एका व्हिडीओत तो गिटार वाजवत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेवटच्या व्हिडीओत १३ वर्षे पूर्ण झाल्यानंतर काय वाटतंय हे तो सांगत आहे. कबीरला १३ वर्षे पूर्ण झाली आहेत.
कबीरला १३ वर्षे झाली पूर्ण
हे व्हिडीओ शेअर करीत सुहृद गोडबोले यांनी लिहिले, “आमच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! आठवणींचा खजिना उलगडणारे, प्रत्येक क्षण पुन्हा जगायला लावणारे १३ वर्षांच्या या सुंदर प्रवासाच्या निमित्ताने १३ खास व्हिडीओ.”
पुढे त्यांनी लिहिले, “तुझा बोबड्या बोलांपासून आत्मविश्वासाने, स्पष्टपणे व्यक्त होणाऱ्या मुलापर्यंतचा प्रवास अगदी जवळून पाहण्यात मजा आली.”
शेवटी त्यांनी असेही लिहिले की, आता किशोरवयाच्या नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. हा टप्पाही तितकाच सुंदर, आनंदी आणि अविस्मरणीय ठरो.
सुहृद गोडबोले यांच्या पोस्टवर सखी गोखले, प्रिया बापट, अमृता देशमुख, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकार आणि चाहत्यांनी कबीरवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
