Girija Oak Godbole on In-Laws: गिरिजा ओक नुकतीच ‘भारत भाग्य विधाता’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अभिनेत्री विविध मुलाखतींमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. मुलाखतींमध्ये ती तिच्या करिअर, करिअरमधील विविध अनुभवांबद्दल, तिच्या खासगी आयुष्याबद्दल तसेच नॅशनल क्रश हा टॅग मिळाल्यानंतर तिच्या आयुष्यात काय बदल झाले, याबद्दलही मन मोकळेपणाने बोलत असते. गिरिजा तिच्या कुटुंबाबद्दलही बोलताना दिसते.
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रीने ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत गिरिजाला विचारले की, सासरच्या मंडळींबरोबर तुझे नाते कसे आहे? यावर गिरिजा म्हणाली, “माझ्या सासूचं आणि माझं प्रचंड पटतं. आम्ही एकत्र खूप टाइमपास करतो. मी जेव्हा तिच्याकडे जाते, तेव्हा दर वेळी मला डबे भरून छान छान खायला देते. माझ्या आजे-सासूबाईसुद्धा फार कमाल आहेत. आमच्यात वयाचं खूप अंतर आहे; पण आम्ही खूप विषयांवर बोलतो. काही वर्षांपासून त्यांची प्रकृती नरम-गरम आहेत. पण, अगदी अलीकडच्या काळापर्यंत त्या स्वत:चं काम स्वत: करायच्या. त्यांचं वय ९४-९५ वर्षं आहे. त्या कमाल आहेत.”
नणंद मृण्मयी गोडबोलेबद्दल गिरिजा म्हणाली, “माझी नणंद आणि मी, आम्ही दोघी एकत्र खूप टाइमपास करतो. एक तर आम्ही सारख्या वयाच्या आहोत. आमच्यात महिन्या-दीड महिन्याचा फरक आहे. ती आता मुंबईतही राहते. त्यामुळे वरचेवर पुण्यात-मुंबईत भेटणंही होतं. मला ती खूप आवडते, माझं तिच्यावर प्रचंड प्रेम आहे. गोडबोलेंच्या घरात पप्पा विनोदी लिहितात, त्यात त्यांचा हातखंडा आहे. पण, तोडीस तोड आणि किंवा कधी कधी जास्त मृण्मयीची विनोद बुद्धी आहे. ती आसपास असली की, आम्ही न थांबता हसत असतो.
सासरे श्रीरंग गोडबोले यांच्याबद्दल गिरिजा म्हणाली, “सुरुवातीला आमच्यात तितकी सहजता नव्हती. ते तितक्या बोलक्या स्वभावाचे नाहीत. पण, आता १५-१६ वर्षांत ती सहजता आली आहे. आम्ही विविध विषयांवर बोलू शकतो. माझे सासरे असे आहेत की, तुम्ही जगातल्या कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकता. त्या विषयातलं त्यांना एक तर ज्ञान असतं किंवा कुतूहल असतं. त्यामुळे ते एक तर तुमचं ऐकू शकतात किंवा तुमचं ऐकून तरी घेतात. तर त्यांचं व्यक्तिमत्त्व खूपच कमाल आहे.”
दरम्यान, आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
