आपल्या सहज-सुंदर अभिनयाने सर्वांची मनं जिंकून घेणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून गिरिजा ओकला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वीच गिरिजा ‘नॅशनल क्रश’ म्हणून देखील नावारुपाला आली आहे. तिचे निळ्या साडीवरचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यासह महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गिरिजाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मुलाखत घेतली होती. याबद्दल तिला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला. या दोन दिग्गज नेत्यांबद्दल गिरिजा नेमकं काय म्हणालीये जाणून घेऊयात.

अभिनेत्री गिरिजा ओक अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी विविध कार्यक्रमांमध्ये भेटले आहे. त्यांची मी फक्त मुलाखत घेतली होती. पण अशी स्पेसिफिक ओळख सांगायची झाली तर, नितीन गडकरीजी यांच्याशी माझी ओळख आहे कारण, माझी आई आणि नितीनजी हे एकमेकांना लहान असल्यापासून ओळखतात. शाळेत असतानाची त्यांची ओळख आहे.”

“गेल्यावर्षी मला नितीनजींच्या हस्ते ‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ हा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा ते कार्यक्रमाला आले होते आणि मी जेव्हा रंगमंचावर पुरस्कार घ्यायला गेले… तेव्हा त्यांनी पुरस्कार देतानाच विचारलं होतं की, आई कुठेय? मी त्यावेळी रंगमंचावरूनच त्यांना दाखवलं होतं की, आई तिथे बसलीये. मी आईला मग खुणावलं हात वर करून दाखव.”

“कार्यक्रम झाल्यावर मग आम्ही त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या आजूबाजूला आधीच भरपूर गर्दी जमा झाली होती. पण, तेव्हा त्यांनी आईला आणि मला पाहिलं आणि ते सर्वांना अतिशय नम्रपणे म्हणाले, जरा मला पाच मिनिटं द्या…माझी बालमैत्रीण आलीये. मग ते बाजूला येऊन आम्हा दोघींशी बोलले. त्यांची ओळख फार जुनी आहे. नितीनजी जेव्हा कधीही भेटतात आपुलकीने सर्वांची विचारपूस करतात. त्यांच्या अनेक नातेवाईकांना सुद्धा मी ओळखते. आम्ही नागपूरचे असल्याने आम्ही बऱ्याच जणांना आपआपसांत ओळखतो.” असं गिरिजाने यावेळी सांगितलं.

‘नॅशनल क्रश’ टॅगबद्दल काय म्हणाली गिरिजा ओक?

“नॅशनल क्रश झाल्यावर अर्थात खूप मजा येते… खूप वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात…अनेक वेगवेगळ्या गोष्टी अनुभवता येतात. पण, मी याआधी सुद्धा सांगितलं आहे आणि माझ्या एका लेखातही मी म्हटलं होतं की, याला प्रसिद्धीची लाट म्हणतात. खरंच ही प्रसिद्धी एका लाटेसारखीच असते ती येते…आणि मग ती लाट जाते सुद्धा! त्यामुळे आपण या गोष्टीची देखील तयारी ठेवली पाहिजे की, ही लोकप्रियता जशी आलीये… तशी ती कधीतरी ओसरणार सुद्धा आहे. त्यानंतर मग पुन्हा तुमचं नॉर्मल आयुष्य सुरू होईल.” असं मत गिरिजाने व्यक्त केलं.