मराठीसह बॉलीवूड मनोरंजनसृष्टी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून गिरिजा ओकला ओळखलं जातं. गिरिजा गेल्या काही महिन्यांपासून ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. गिरिजा ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं आणि गिरिजाच्या आईचं नाव पद्मश्री फाटक. लग्नानंतर काही वर्षांनी गिरिश ओक व पद्मश्री यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. पद्मश्री यांना घटस्फोट दिल्यावर २००८ मध्ये गिरीश ओक यांनी दुसरं लग्न केलं. यानंतर अभिनेत्री आपल्या आईबरोबर राहू लागली.

“बाबांबरोबर आता नातं कसं आहे?” याविषयी सांगताना गिरिजा ओक ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली, “लहान असताना मी माझ्या बाबांची सगळ्यात मोठी फॅन होते. त्यांच्या प्रत्येक नाटकांचे मी जवळपास २० प्रयोग तरी पाहिले असतील. ‘कुसुम मनोहर लेले’, ‘ज्याचा त्याचा प्रश्न’, ‘देहभान…’ मी या सगळ्या नाटकांचे प्रयोग आवर्जून पाहिले आहेत. ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकाचे तर मला सगळे प्रयोग पाठ होते…इतकं मला ते नाटक आवडायचं. त्या नाटकात बाबा जेव्हा व्हिलनची भूमिका साकारायचे तेव्हा मला नाही आवडायचं. मी प्रयोगाच्या आधी त्यांना विचारून घ्यायचे की, आज कोणती भूमिका आहे? भाच्या खोटेची भूमिका बाबा साकारणार असतील तेव्हाच मी जास्त जायचे, कारण ती हीरोची भूमिका होती. एकंदर काय तर बाबांच्या कामाची मी खूप मोठी फॅन होते.”

गिरिजा पुढे म्हणाली, “कालांतराने माझे आई-वडील वेगळे झाले आणि मी माझ्या आईबरोबर राहू लागले. त्यामुळे नंतर बाबांशी तसा फार संपर्क आला नाही. अजूनही एक कलाकार म्हणून मला त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. त्यांनी आजवर जे काही काम केलंय, जे काही अचिव्ह केलंय…त्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वकष्टाने आणि स्वत:च्या हिमतीवर मिळवल्या आहेत. म्हणूनच मला त्यांचा खूप अभिमान आहे. पण, तसे आम्ही फार संपर्कात नाही आहोत…कारण, मी माझ्या आईबरोबर राहू लागले.”

“आता बाबांचा सुद्धा एक परिवार आहे. त्यांची बायको आहे, मुलगी आहे आणि सगळं उत्तम आहे. जेव्हा असं कधी कुटुंबाचं एकत्र येणं होतं तेव्हा आम्ही भेटतो. पण, असं रोजचं भेटणं-बोलणं असं फार उरलेलं नाहीये. लग्नानंतर मी सुद्धा माझ्या आयुष्यात व्यग्र झाले. अजूनही मला खूप लोक येऊन भेटतात आणि सांगतात, ‘तुम्ही गिरीश ओकांची मुलगी ना…’ हे ऐकून मला खूप छान वाटतं. कारण, अजूनही लोक मला त्यांची मुलगी म्हणून ओळखतात. काहीजण भेटले की असंही म्हणतात, ‘तुमच्या वडिलांसारखं आम्हाला तुमचंही कौतुक वाटतं…’ तेव्हा मला अजून भारी वाटतं.”

“आता मी चांगलं काम केल्यावर लोक बाबांचं नाव घेऊन ज्याप्रमाणे कौतुक करतात. तसं मी कधी वाईट काम केलं की, लोक त्यांना काही बोलतील याचंही मला दडपण असतं. एवढ्या चांगल्या नटाची मुलगी हे काय करते…असं कधी व्हायला नको…या सगळ्या गोष्टींची जाणीव ठेवूनच मी काम करते.” असं मत गिरिजाने व्यक्त केलं आहे.