सिनेमात किंवा टीव्ही मालिकांमध्ये सावत्र भावंडांमध्ये नेहमीच भांडणं, वाद होत असल्याचं दाखवलं जातं. पण, रील आणि रिअल आयुष्य फारच वेगळं असतं. खऱ्या आयुष्यात खूप छान आणि आपल्याला समजून घेणारी नाती आपोआप तयार होतात. गिरिजा ओकने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. गिरिजाच्या आईने दुसरं केल्यावर अभिनेत्रीला नव्याने दोन भावंडं भेटली. त्यांच्याबरोबर काही वर्षांनी खूप छान बॉण्डिंग तयार झालं, असं अभिनेत्रीने सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.

गिरिजा ओक म्हणाली, “आईचं दुसरं लग्न झाल्यावर मध्येच माझ्या मनात विचार यायचा की, आईचा सहवास आपल्या वाट्याला का येत नाही? पण, त्यानंतर मला लगेच असंही वाटायचं की, तिचंही एक स्वत:चं आयुष्य आहे. त्यामुळे आईला फोन करून मी कधीच असं विचारलं नाही की, ‘तू आज इथे का नाहीयेस?”

यावर गिरिजाच्या आई म्हणाल्या, “तिच्या या समजूतदार स्वभावामुळेच मी हा निर्णय घेऊ शकले. मलाही लक्षात यायचं की तिला काही दिवस याचा खूप त्रास होईल. म्हणूनच मी तिला सांगितलं होतं की, तू कधीही माझ्याकडे येऊ शकतेस. आमच्या घरच्या मुलांबरोबर सुद्धा तिची तेवढीच छान मैत्री आहे.”

गिरिजा पुढे सांगते, “या दोघांचं लग्न झालं तेव्हा माझी बहीण लहान होती. ती १५ वगैरे वर्षांची होती आणि मी २० वर्षांची होते. मेहुल माझा भाऊ, चैताली माझी बहीण आणि संजय आईचे दुसरे पती मी त्यांना डॅडी म्हणायचे…या तिघांनी मला खूप प्रेमाने आपलंसं करून घेतलं. आमच्यामध्ये भावा-बहिणीसारखं प्रेम निर्माण व्हावं यासाठी आईने कधीच दबाव दिला नाही. कारण, आजपासून तुम्ही भाऊ-बहीण असं आपण कधीच कोणाला सांगू शकत नाही. काही नात्यांना वेळ द्यावा लागतो. ती नाती जेवढी नैसर्गिकरित्या फुलत जातील तेवढं छान होतं. त्यामुळे आम्हालाही या सगळ्या गोष्टी स्वीकारायला थोडा वेळ लागला. आमच्यावर कधीच कोणत्या गोष्टी लादल्या गेल्या नाहीत.”

“आता आम्ही सगळे खूप छान क्लोझ आहोत. हे नातं हळुहळू तयार झालं. मला त्या घरात खूप प्रेम मिळालं. अरे बापरे ही सावत्र बहीण वगैरे अशी प्रतिक्रिया आम्ही कधीच दिली नाही. पण, आता बॉण्ड एवढा घट्ट झालाय की, मी आणि माझी बहीण आम्ही थोडाफार वात्रटपणा सुद्धा करतो. जर कुणी विचारलं की ही कोणती बहीण? तर आम्ही ‘ही सावत्र बहीण’ असं सांगतो. मग, अनेकदा असे प्रश्न विचारणाऱ्या लोकांचेही चेहरे बदलतात. पण, सांगायचा मुद्दा असा की, आता आमच्यात खूप छान नातं निर्माण झालं आहे. आता १६-१७ वर्षे झाली आम्ही सगळे एकत्र आहोत.”

दरम्यान, अभिनेत्री गिरिजा ओक ही ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. गिरिजाच्या आईचं नाव पद्मश्री फाटक. लग्नानंतर काही वर्षांनी या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आई-बाबा वेगळे झाल्यावर सुरुवातीला प्रचंड तणावात होते असं अभिनेत्रीने ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात २०११ मध्ये निर्माता सुहृद गोडबोलेशी लग्न केलं आहे. गिरिजा ओक ही प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक श्रीरंग गोडबोले यांची सून आहे.