आई अन् मुलीचं नातं फार वेगळं, आपुलकीचं असतं. मुलीचं लग्न झाल्यावर तिला सासरी सर्वात जास्त आपल्या आईची आठवण येते. अभिनेत्री गिरिजा ओकने सुद्धा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या आईबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. गिरिजाच्या आई पद्मश्री यांनी तिला लहानपणापासून खूप शिस्तीत वाढवलं, स्वावलंबी बनवलं, या दोघींमध्ये आजही खूप सुंदर बॉण्डिंग आहे. या मायलेकींनी सुलेखा तळवलकर यांच्या ‘दिल के करीब’ कार्यक्रमात उपस्थिती लावली होती.
गिरिजा ओक यावेळी म्हणाली, “आई मी तुला हे कधीच बोलले नाहीये. आता सगळ्यांनाच माहिती आहे की, इंडस्ट्रीत सलग १०-१२ तास आपल्याला काम करावं लागतं. लग्नाआधी मी एकटी राहायचे, त्यानंतर सुहृद आणि माझं लग्न झालं त्यावेळी कसं व्हायचं…आम्ही दोघंही आपआपल्या कामात व्यग्र होतो. कधी तो कामानिमित्त बाहेर असायचा, कधी मी कामानिमित्त बाहेर जायचे. कबीरच्या जन्मानंतर सुद्धा जेव्हा मी कामानिमित्त मुंबईला राहायला यायचे…तेव्हा मी एकटी असायचे. आपल्या शिफ्ट अनेकदा १२-१२ तासांच्या असतात. प्रवास वगैरे सगळं पकडून अनेकदा १६ तास होतात. दिवसभर शूटिंग नंतर प्रवास करून घरी आल्यावर…आता आपल्या घरी कुणीच नाहीये ही भावना मला आवडत नव्हती.”
गिरिजा पुढे म्हणाली, “माझ्या घरात सगळे या क्षेत्रात सक्रिय असल्याने सगळेच बिझी असायचे. कोणाच्या घरी यायच्या वेळा ठरलेल्या नसायच्या. त्यामुळे मला कधीतरी खूप असं वाटायचं की, आता जर आई माझ्याबरोबर असती, तर एकदा तरी मला गरम जेवण मिळालं असतं. कुणीतरी माझ्यासाठी दार उघडलं असतं. मला तेव्हा खरंच तिची फार आठवण यायची. तेव्हा आईचंही दुसरं लग्न झालं होतं…म्हणजे माझ्या लग्नाच्या थोडंसं आधी. तिने जेव्हा दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा ती आधी माझ्याशी बोलली होती. अर्थात तेव्हा मलाही खूप आनंद झाला होता. कारण, पहिली गोष्ट म्हणजे यासाठी खूप हिंमत लागते.”
“बऱ्याच बायकांच्या मनात असं असतं की, आता कोण यात पडणारे पण, मला माझ्या आईचं नेहमीच कौतुक वाटायचं. तिने पुन्हा स्वत:चं आयुष्य उभं केलं. स्वत:चं सुख तिने स्वत: घडवलं. कशाला उगाच…आता मी फक्त पडून राहते वगैरे असा विचार तिने केला नाही. तिने तिचं घर, नवरा, मुलं यांच्याबरोबर एक नवीन नातं निर्माण केलं. त्या वयात तिने हा निर्णय घेतला ही मोठी गोष्ट आहे. आम्ही दोघींनी एकत्रच याबद्दलचे निर्णय घेतले होते. मला या गोष्टीचं खूप कौतुक आहे इतकंच नव्हे तर मी तिच्या लग्नात साक्षीदार म्हणून सही केली होती. मी माझ्या आईला तुमच्याकडे पाठवतेय अशी ती भावना होती…तिच्या सुखासाठी मी आनंदी होती. पण, कधीतरी मनात असं वाटायचं….का? माझी आई माझ्याजवळ का नाही?” अशा भावना गिरिजाने व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, अभिनेत्री गिरिजा ओक ही ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. गिरिजाच्या आईचं नाव पद्मश्री फाटक. लग्नानंतर काही वर्षांनी या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. आई-बाबा वेगळे झाल्यावर मी प्रचंड तणावात होते. मी एका घटस्फोटित आई-वडिलांची मुलगी आहे याचं ओझं, दडपण कायम माझ्यावर असायचं असं गिरिजा ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. पुढे, अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात २०११ मध्ये निर्माता सुहृद गोडबोलेशी लग्न केलं. गिरिजा ओक ही प्रसिद्ध दिग्दर्शक व लेखक श्रीरंग गोडबोले यांची सून आहे. गिरिजा व सुहृद यांना मुलगा असून त्याचं नाव कबीर आहे.
