लोकप्रिय मराठी अभिनेत्री गिरिजा ओकने २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जवान’ चित्रपटात बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानबरोबर काम केलं होतं. शाहरुख माणूस म्हणून कसा आहे, त्याने चेन्नईत शूटिंग सुरू असताना सहकलाकारांसाठी एक खास गोष्ट केली होती ती नेमकी काय आहे? याबद्दल अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

गिरिजा ओक ‘हॉटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगते, “शाहरुख माणुसकीला खूपच चांगले आहेत. शूटिंगच्यावेळी त्यांच्याकडून एक डायलॉग बोलण्यात चूक झाली होती, त्यावेळी सेटवरच्या जुनियरपासून त्यांनी सर्वांची माफी मागितली होती. माझ्यामुळे तुम्हाला आणखी एक टेक करावा लागणार आहे…सॉरी असं ते सर्वांना म्हणत होते. कारण, आधीच बराच उशीर झाला होता. अजून एक गोष्ट म्हणजे, तेव्हा सेटवर फार थंडी वाजत होती.”

“जवान चित्रपटाच्या सेटवर शाहरुखला विग लावून शूट करायचं होतं. त्यामुळे टीमला सेटवरचं तापमान कमी ठेवावं लागायचं. कारण, थंड वातावरण ठेवलं नाहीतर त्यांना त्या विगमुळे प्रचंड घाम यायचा. पण, यामुळे अन्य सहकलाकारांना फार थंडी वाजायची. शॉट रेडी झाला की, सगळे कलाकार जॅकेट वगैरे काढून सीनसाठी तयार व्हायचे. याचदरम्यान शाहरुखकडून डायलॉग बोलण्यात चूक झाली आणि संपूर्ण सीन पुन्हा करावा लागणार होता. आधीच थंडी, त्यातही उशीर झालेला म्हणून त्यांनी सर्वांची माफी मागितली होती. सर्वांकडे पाहून ते मनापासून I Am Really Sorry असं म्हणत होते. इतक्या मोठ्या स्टार अभिनेत्याला हे करायची खरंच आवश्यकता नव्हती. पण, त्यांच्यात प्रचंड माणुसकी आहे. आपण कोणाबरोबर काम करतोय याची त्यांना जाणीव असते आणि ते नेहमी सेटवर सर्वांचा आदर करतात.” असं गिरिजा ओकने सांगितलं.

“मला अजून एक गोष्ट खूप चांगली आठवतेय. जवानचा दिग्दर्शक अ‍ॅटलीचा वाढदिवस होता आणि आम्ही सगळे चेन्नईत शूट करत होतो. आम्ही जिथे राहत होतो, ते हॉटेल सेटच्या लोकेशनपासून फार जवळ होतं. याउलट अ‍ॅटलीच्या बर्थडेचं सेलिब्रेशन फार दूर होतं. आम्हाला १ तासाचा प्रवास करून तिथे जायचं होतं. आम्ही सेटवरच्या मुली सर्वांना बाय करून निघालो त्यावेळी शाहरुख सरांनी स्वत:हून आम्हाला विचारलं होतं…तुम्ही तिथे कशा जाणार आहात? आम्ही सगळ्याजणी प्रोडक्शनच्या कारने जाणार होतो; तसं आम्ही त्यांना सांगितलं. त्यावेळी शाहरुख सरांनी त्यांच्या सुरक्षारक्षकाला सांगितलं…आणि त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील एक गाडी आम्हा मुलींच्या गाडीच्या मागोमाग जाईल अशी व्यवस्था केली. आम्हाला हॉटेलपर्यंत सोडायला त्यांचे गार्ड्स आमच्याबरोबर आले होते. अगदी आम्ही हॉटेलच्या लिफ्टमधून जाईपर्यंत शाहरुखचे गार्ड्स उभे होते आणि त्यानंतर आम्हाला गुड नाइट बोलून गेले.” असा अनुभव गिरिजाने सांगितला आणि शाहरुख खानचं कौतुक केलं.