नाना पाटेकरांबरोबर काम करण्याची संधी मिळणं ही अनेक कलाकारांच्यादृष्टीने मोठी गोष्ट आहे. अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनासुद्धा त्यांच्याबरोबर काम करयाचं होतं. जे त्यांनी केलंही. परंतु, यासाठी नाना पाटेकरांना मनवणं सोप नव्हतं. नुकतंच गिरीश कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांबरोबर काम करण्याची आठवण सांगितली आहे.

गिरीश कुलकर्णी व नाना पाटेकर यांनी ‘देऊळ’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. २०११साली आलेल्या या मराठी चित्रपटात नाना पाटेकरांनी भाऊ गेलांडे तर गिरीश कुलकर्णी यांनी केश्या ही भूमिका साकारली होती. आता गिरीश कुलकर्णी यांनी या चित्रपटासाठी त्यांनी नाना पाटेकर यांना कसं मनवलं होतं याबद्दल सांगितलं आहे. इसापनितीला दिलेल्या मुलाखतीत गिरीश कुलकर्णी यांनी नाना पाटेकरांचा अभिनय, त्यांनी केलेलं काम त्यांना खूप आवडतं आणि त्यांनी त्यांची अनेक नाटकं, चित्रपट पाहिले आहेत असंही सांगितलं.

गिरीश कुलकर्णींनी सांगितला किस्सा

‘देऊळ’ या चित्रपटासाठी नाना पाटेकर यांचा होकार कसा मिळवला याबद्दल गिरीश कुलकर्णी म्हणाले, “माझा अट्टाहास होता की माझ्या पहिल्या चित्रपटात नाना असावेत. त्यामुळे वळूच्या वेळीच खूप प्रयत्न केला होता, पण त्यांनी नकार दिलेला. मी पण खूप ताठ्यात होतो. ते मला म्हणाले तू घरी येऊन संहिता ठेव मी म्हटलं नाही मी वाचून दाखवणार. ते म्हणाले जा घरी. असं ते सगळं होतं पण मग नंतर मला चूक उमगली. देऊळसाठी मात्र मला तेच हवे होतं. अट्टाहास होता. सहा महिने जवळजवळ तंगवलं त्यांनी. मी पण ठाम होतो की नानाच पाहिजे आणि मग ते झालं शक्य.”

याच मुलाखतीत नाना पाटेकरांचं कौतुक करताना गिरीश कुलकर्णी म्हणाले, “मी त्यांचं नाटकही खूप पाहिलं. तेव्हा मी कोणीच नव्हतो सुदैवाने. माझ्याकडे पैसे नसतानाही मी पुरुषचा प्रत्येक प्रयोग पाहिला. सिनेमे तर खूप पाहिले.”

दरम्यान, २०११ साली आलेल्या उमेश कुलकर्णी दिग्दर्शित ‘देऊळ’ या चित्रपटातील भूमिकेसाठी गिरीश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यामध्ये नाना पाटेकर, गिरीश कुलकर्णी यांच्यासह सोनाली कुलकर्णी, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे हे कलाकारही झळकले होते.