मराठीसह बॉलीवूड मनोरंजनसृष्टी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री म्हणून गिरिजा ओकला ओळखलं जातं. गिरिजा सध्या ‘नॅशनल क्रश’ म्हणून नावारुपाला आली आहे. तिचे निळ्या साडीतले फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यानंतर देशभरात सर्वत्र गिरिजाची चर्चा होऊ लागली. चाहत्यांनी इतकं भरभरून प्रेम दिलं यासाठी गिरिजाने एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचे आभार मानले होते. याशिवाय, मॉर्फ केलेल्या आक्षेपार्ह फोटोंवर तिने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याचबाबत आता गिरिजाचे वडील व ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
गिरीश ओक ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना म्हणाले, “मला तिचं खूप कौतुक आहे. तिच्या कामाचं…एकंदर गिरिजा जे काही करतेय त्याचं नेहमीच मला कौतुक असतं रादर ते कायम असायलाच पाहिजे. पण, त्या फोटोंवर ज्या कमेंट्स येतात त्या वाईट आहेत. स्वत:ची ओळख लपवून, बिनकामाचे, रिकामटेकडे लोक काहीही कमेंट्स करतात. या लोकांची बौद्धिक कुवत कितपत आहे मला माहिती नाही…पण, पडद्याआडून कमेंट करणं चुकीचं आहे…ही किळसवाणी वृत्ती आहे. अर्थात, माझ्यासारखा माणसाला या सगळ्याचा त्रास होत नाही पण, काही लोकांना याचा खरंच खूप मानसिक त्रास होऊ शकतो.”
सचिन पिळगांवकरांनाही ट्रोल करणं चुकीचं…
“जे लोक सोशल मीडियावर अशा चुकीच्या कमेंट्स करतात..त्यांना कामधंदे नाहीयेत. त्यांच्यावर कोणताही निर्बंध नाहीये. आपण कोणाबद्दल काय बोलतोय, काय लिहितोय हे सुद्धा त्यांना कळत नाही. मध्यंतरी काही लोक सचिन पिळगांवकरांना ट्रोल करत होते…हे सगळं पाहून मला खरंच वाईट वाटलं. तो माणूस बालवयापासून इंडस्ट्रीत काम करतोय…खरंच या ट्रोलर्सची त्यांच्याविषयी बोलण्याची लायकी तरी आहे का? सोशल मीडियावर अनेक गोष्टी चांगल्या आहेत…ज्याचं मी सुद्धा आवर्जून कौतुक करतो. पण, हे ट्रोलिंग मला अजिबात पटत नाही, त्याला काहीच अर्थ नाही आणि मी कितीही बोललो तरी ते थांबणार नाहीये.”
दरम्यान, आजवर गिरिजाने मराठीसह अनेक हिंदी सिनेमांमध्येही काम केलेलं आहे. शाहरुख खान, आमिर खान अशा बॉलीवूडच्या बड्या अभिनेत्यांबरोबर तिने स्क्रीन शेअर केली आहे. ती अलीकडेच अभिनेता मनोज बाजपेयी मुख्य भूमिकेत असलेल्या ‘इन्स्पेक्टर झेंडे’ सीरिजमध्ये झळकली होती. तिने यामध्ये साकारलेल्या भूमिकेचंही सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं.

