संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या सिनेमाची ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाली आहे. ‘फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ने नुकतीच याबाबत माहिती दिली आहे. ‘गोंधळ’ सिनेमा १४ नोव्हेंबर २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. महाराष्ट्राची परंपरा, लोककला, श्रद्धा आणि एकाच रात्री घडणाऱ्या गूढ रहस्यावर या सिनेमाचं कथानक आधारित आहे. आता ‘गोंधळ’ सिनेमाने ऑस्करपर्यंत झेप घेतल्याने पुन्हा एकदा मराठी सिनेविश्वाचं नाव आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पोहोचलं आहे. सध्या या चित्रपटाच्या संपूर्ण टीमवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

गोंधळ सिनेमात किशोर कदम, इशिता देशमुख, योगेश सोहोनी, निषाद भोईर, अनुज प्रभू, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, ऐश्वर्या शिंदे, कैलाश वाघमारे, प्रभाकर मठपती, विठ्ठल काळे, प्रवीण डाळींबकर, शरद जाधव, पूनम पाटील, प्रशांत देशपांडे हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये झळकले आहेत.

‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील विश्वा म्हणजेच प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अनुज प्रभूने या सिनेमात साहेबराव (मुरली) ही भूमिका साकारली आहे. ‘गोंधळ’च्या ऑस्करवारीबाबत समजल्यावर अनुजचा आनंद सुद्धा गगनात मावेनासा झाला आहे. इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

अनुज लिहितो, “हा माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, खरंतर आता माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाहीत, इतका आनंद मला झालाय”

gondhal fame marathi actor anuj prabhu
अभिनेता अनुज प्रभूची पोस्ट

चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अनुजने साहेबराव या पात्रासाठी खास पोस्ट लिहिली होती. तो म्हणाला होता, “साहेबराव…कोणीतरी अगदी योग्यच म्हटलं आहे…’आव्हानांना मर्यादा घालू नका, आपल्या मर्यादांनाच आव्हान द्या’ साहेबराव हे असंच एक आव्हान होतं… जे मी आनंदाने स्वीकारलं, असं आव्हान जे मी मनापासून एन्जॉय केलं आणि यामुळे कलाकार म्हणून मला नक्कीच अधिक प्रगल्भ होता आलं.”