Gulkand Marathi Movie Box Office Collection Day 4 : गेल्या महिन्याभरात मराठी बॉक्स ऑफिसवर लागोपाठ अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’, ‘सुशीला-सुजीत’, ‘आता थांबायचं नाय’, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, ‘गुलकंद’ अशा अनेक सिनेमांचा यात समावेश आहे. यापैकी, १ मे रोजी प्रदर्शित झालेला ‘गुलकंद’ चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांत प्रदर्शित झालेल्या सिनेमांच्या तुलनेत ‘गुलकंद’ने बॉक्स ऑफिसवर दणक्यात सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने ५५ लाखांचा गल्ला जमावला होता. यानंतर दुसऱ्या दिवशी ‘गुलकंद’च्या कमाईत काहीशी घसरण पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी या सिनेमाने फक्त २५ लाख कमावले. यानंतर तिसऱ्या दिवशी ‘गुलकंद’च्या कमाईत वाढ होऊन सिनेमाने ४२ लाखांचा गल्ला जमावला. तर, रविवारी चौथ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. ‘गुलकंद’ने रविवारी ५७ लाख कमावले.

यामुळे, ‘गुलकंद’चं ४ दिवसांचं वर्ल्डवाइड कलेक्शन आता २.०१ कोटी इतकं झालं आहे. असं वृत्त इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलं आहे. सध्याच्या घडीला ‘गुलकंद’ सिनेमाचे बरेच शो हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे आता येत्या काळात या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान, ‘गुलकंद’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं, तर यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट आहे. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया हे या ‘गुलकंद’ सिनेमाचे निर्माते आहेत.

दरम्यान, प्रेम कधीही, कुठेही आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही वयात होऊ शकतं… अशी प्रेमाची हटके अन् मजेशीर गोष्ट ‘गुलकंद’मधून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. या सिनेमातील सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांची आगळीवेगळी केमिस्ट्री सध्या सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.