झी स्टुडिओज निर्मित व अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता सुबोध भावे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा टीझर व ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजाने या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात होते. आता ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता सुबोध भावेने राज ठाकरेंची मुलाखत घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज ठाकरे यांनी या चित्रपटाला आवाज दिला आहे. या मुलाखतीदरम्यान सुबोध भावेने व्हॉईस ओव्हर देण्यासाठी ‘हर हर महादेव’ चित्रपटाची निवड का केली? असा प्रश्न विचारला. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करत एक किस्सा सांगितला. राज ठाकरे म्हणाले, “बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत जेव्हा मी रायगडावर घेतली होती त्यावेळी अचानक माझ्यावर व्हॉईस ओव्हरची जबाबदारी आली. व्हॉईस ओव्हर करणं हे माझं काम नव्हतं. मी याचा विचारही कधी केला नव्हता. २००३मध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत जेव्हा मी घेतली तसेच त्यासाठी जेव्हा व्हॉईस ओव्हर दिला तेव्हा मी ते वाचल्यासारखंच केलं होतं.”

पुढे ते म्हणाले, “२००४मध्ये शिवसेनेचे नऊ चित्रपट आम्ही केले होते. या चित्रपटांना आवाज माझे मित्र अजित भुरे यांचा होता. हे सगळे चित्रपट म्हणजे अ‍ॅड फिल्म्स होत्या. त्यामधील एक अ‍ॅड फिल्म मुंबईच्या बॉम्ब ब्लास्टवर आधारित होती. ती फिल्म निवडणूक आयोगाने रद्द केली. कारण ती फिल्म फारच अंगावर येते असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. या अ‍ॅड फिल्मला सुरुवातीला फक्त मी आवाज दिला होता. तेही फक्त ‘मुंबई’ हा शब्द माझ्या आवाजात होता. बाकी सगळा आवाज हा अजित भुरे यांचा होता. फिल्म्स आल्या आणि आम्ही त्या फिल्म्स बाळासाहेबांना दाखवायला गेलो.”

आणखी वाचा – ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या मानधनाबाबत सुबोध भावे म्हणाला, “भूमिकेसाठी मिळालेले पैसे… “

“बाळासाहेबांनी नऊ फिल्म्स पाहिल्या. म्हणाले, या सगळ्या फिल्म्स चांगल्या झाल्या आहेत. तेव्हा त्यांनी अजित भुरे यांना विचारलं या एका फिल्ममध्ये मुंबई कोण बोललं आहे. तर अजित भुरे म्हणाले राजा बोलला आहे. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, अच्छा मला वाटलंच. त्यानंतर बाळासाहेब म्हणाले की, सगळ्या नऊ चित्रपटांना तुझाच आवाज तू द्यायचा. व्हॉईस ओव्हर कसा असावा, शब्दांवर कसा आणि कुठे जोर द्यायचा हे तेव्हा माहित नव्हतं. पण हे सगळं मला अजित भुरे यांनी शिकवलं.” राज ठाकरे यांनी या मुलाखतीनिमित्त जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Har har mahadev movie subodh bhave special interview with raj thackeray talk about voice over and balasaheb thackeray see details kmd
First published on: 16-10-2022 at 19:22 IST