Mumbai Pune Missing Link Hemant Dhome Post: मुंबई, पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून अनेक ठिकाणी जनजीवन पूर्णपणे कोलमडले आहे. शाळा, महाविद्यालयांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून रस्ते आणि रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. याच दरम्यान मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प समजल्या जाणाऱ्या ‘मुंबई-पुणे मिसिंग लिंक’च्या बोगद्याजवळ दरड कोसळून संरक्षक भिंतीचा स्लॅब पुलावर कोसळल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ शेअर करत मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने केवळ चार शब्दांत पोस्ट लिहीत सणसणीत टोला लगावला आहे, ज्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
हेमंत ढोमेने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मुंबई-पुणे मिसिंग लिंकचा स्लॅब कोसळल्याचा व्हिडीओ शेअर केला आणि फक्त चार शब्दांचं कॅप्शन लिहिलंय. हेमंत ढोमेच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याची मिसिंग लिंकसंदर्भातील ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.
“नावाला जागला, मिसिंग झाला”, अशी पोस्ट हेमंतने केली आहे. त्याचबरोबर त्याने एक व्हिडीओदेखील शेअर केला आहे. यात मिसिंग लिंकवर मोठ्या प्रमाणात पाणी पडताना दिसतंय.

दरम्यान, दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दरड कोसळल्याने बोगद्याच्या संरक्षक भिंतीचा भाग पुलावर कोसळला. यावेळी पुलावर कोणतेही वाहन नसल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र, मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.
सध्या मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आली असून, मिसिंग लिंकवरील मातीचा ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. बोगदा किंवा पुलाचे कोणतेही नुकसान झाले नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरही पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-पुण्यादरम्यानचा संपर्क तुटला आहे.
