Hemant Dhome Reacts On Rahul Gandhi Detain: देशातील NEET पेपरफुटी आणि गैरव्यवहाराविरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला आता राजकीय वर्तुळातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आंदोलक तरुणांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्चच्या निषेधार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी राहुल गांधींना ताब्यात घेतले. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे. “विरोधी पक्षनेत्याला असं उचलून नेणाऱ्या अहंकारी सरकारचा अंत जवळ आलाय,” असा इशाराच हेमंत ढोमेने दिला आहे.

‘नीट’ पेपरफुटी व गैरव्यवहाराविरोधात कॉक्रोच जनता पार्टी मागील अनेक दिवसांपासून दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. २० जुलैला सीजेपीच्या या मोर्चात तरुण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला व अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. पोलिसांच्या अत्याचाराविरोधात काँग्रेसने मंगळवारी आंदोलन केलं. राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी-वाड्रा यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोककल्याण मार्गावरील निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांच्यासह इतर नेत्यांना ताब्यात घेतलं व सायंकाळी सोडून दिलं. राहुल गांधी यांना ताब्यात घेतानाचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. हेच फोटो शेअर करत मराठी अभिनेता व दिग्दर्शक हेमंत ढोमेने संताप व्यक्त केला आहे.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार – हेमंत ढोमे

राहुल गांधींचे फोटो शेअर करत हेमंत ढोमेने लिहिलं, “भारताचा विरोधी पक्षनेता असा उचलून नेणाऱ्या अहंकारी सरकारचा अंत आता जवळ आला आहे. आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार हे नक्की.”

hemant dhome in rahul gandhi detained by delhi police
हेमंत ढोमेची पोस्ट (सौजन्य – इन्स्टाग्रामः

नेमकं काय घडलं?

‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारांच्या मुद्द्यावर राहुल गांधी सातत्याने बोलत होते. मात्र याच मुद्द्यावरून जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनापासून ते दूर होते. पण मंगळवारी तरुण आंदोलकांना व विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीनंतर काँग्रेसने आक्रामक होत पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आंदोलन केलं. विशेष म्हणजे या आंदोलनाबद्दल पोलिसांना कळू नये, ही काळजी काँग्रेसने घेतली होती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी जातोय, असं सांगून सर्वांना तिथे बोलावण्यात आलं. तिथेच आंदोलनाची माहिती दिली आणि जवळपास दोन तास आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधींसह सर्वांना ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं.