‘राजा शिवाजी’नंतर बॉक्स ऑफिसवर एकापाठोपाठ एक मराठी चित्रपटांची दमदार कामगिरी पाहायला मिळत आहे. काही सिनेमांनी प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून तगडी कमाई केली, तर काही चित्रपटांची सुरुवात जरी संथ गतीने झाली असली तरी नंतर बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांची पसंती मिळवली.
अशातच आता एका हॉरर-कॉमेडी मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत सातव्या क्रमांकावर स्थान मिळवलं असून, ललित प्रभाकरच्या ‘सुपर डुपर’ला मागे टाकलं आहे.
या मराठी हॉरर कॉमेडी चित्रपटाने कमावले कोट्यवधी
ज्या मराठी हॉरर-कॉमेडी चित्रपटाबद्दल आम्ही बोलत आहोत, त्या चित्रपटाचं नाव ‘भूतम भयम’ आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रामचंद्र गांवकर यांनी केलं आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही चांगली कमाई केली. चित्रपटाने तिसऱ्या वीकेंडमध्ये १० लाख रुपयांची कमाई केली, तर रिलीजनंतरच्या १९व्या दिवशी ३ लाख रुपयांचा गल्ला जमवला. या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ या मराठी चित्रपटाबरोबर टक्कर झाली होती. मात्र, या स्पर्धेनंतरही ‘भूतम भयम’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई चांगलीच सुरू आहे. कोईमोईच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट तब्बल ४ कोटी रुपये आहे.
उल्लेख केलेल्या माध्यमाच्या माहितीनुसार, ललितच्या ‘सुपर डुपर’ या चित्रपटाने ३.४४ कोटी रुपयांची कमाई केलेली आणि तो चित्रपट सातव्या क्रमांकावर होता. पण आता ‘भूतम भयम’ने ‘सुपर डुपर’ला मागे टाकलं असतून हा टप्पा गाठताच ‘भूतम भयम’ २०२६ मधील सातवा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला.
२०२६ मधील सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० मराठी चित्रपट
‘राजा शिवाजी’ – १०५.६८ कोटी
‘देऊळ बंद २’ – ७४.१६ कोटी
‘क्रांतिज्योति विद्यालय मराठी माध्यम’ – २८ कोटी
‘तंबाडची मंजुला’ – १६.३९ कोटी रुपये
‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ – ८.९७ कोटी
‘घबाडकुंड’ – ७.३८ कोटी
‘भूतम भयम’ – ३.67 कोटी
‘सुपर डुपर’ – ३.४४ कोटी
‘मामाच्या गाव्याला जाऊया’ – १.७७ कोटी
‘तिघी’ – १.६४ कोटी
दरम्यान, ‘भूतम भयम’ने आतापर्यंत बजेटपैकी किती रक्कम वसूल केली आहे, याबद्दल बोलायचं झालं तर कोईमोईच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने भारतात आतापर्यंत ३.६७ कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाचं बजेट ४ कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. तर चित्रपटाचं नेट कलेक्शन ३.२८ कोटी रुपये इतकं आहे. तर ‘भूतम भयम’ने आतापर्यंत आपल्या बजेटपैकी ८१ टक्के रक्कम वसूल केली आहे.
दरम्यान, ‘भूतम भयम’ हा हॉरर-कॉमेडी थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन रामचंद्र गांवकर यांनी केलं आहे. यात छाया कदम, करण सोनावणे आणि नील सालेकर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्रदर्शित झाल्यानंतरच्या २१ दिवसानंतरही थिएटरमध्ये शो सुरू असून प्रेक्षक चित्रपटगृहात हा सिनेमा पाहण्यासाठी जाताना दिसत आहेत.
