हृता दुर्गुळे सध्या तिच्या ‘आली मोठी शहाणी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अशातच अलीकडेच लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत तिने अभिनेत्रींचं होणारं ट्रोलिंग, लग्नानंतर, वजन वाढल्यानंतर झालेली टीका या सगळ्याबद्दल स्पष्ट वक्तव्य केलं आहे. यावेळी तिने अमराठी मुलाशी लग्न केलं म्हणून तिला ट्रोल केलं होतं आणि तीसुद्धा भविष्यात आई झाल्यानंतर तिलाही ट्रोल केलं जाणारच आहे असं म्हटलं आहे.
हृता दुर्गुळेने यावेळी ती ट्रोलिंगला फारसं महत्त्व देत नाही त्यामुळे कोण तिच्याबद्दल सोशल मीडियावर काय बोलत आहे याने तिला फरक पडत नाही कारण ती सोशल मीडियावर फार सक्रीय नसते आणि कामातच व्यग्र असते. यावेळी तिने तिला सुरुवातीला त्रास झाला होता पण आता फरक पडत नाही अशी प्रतिक्रिया दिलीये.तसेच अलीकडेच कतरिना कैफला तिच्या मुलाच्या जन्मानंतर वाढलेल्या वजनामुळे ट्रोल करण्यात आलं यावरुन निर्माण होणाऱ्या प्रश्नावरही तिने उत्तर दिलं आहे.
हृता दुर्गुळेची प्रतिक्रिया
लोकसत्ताशी संवाद साधताना हृता दुर्गुळे म्हणाली, “मी कालच म्हटलं की ट्रोलिंग खूप बोअर आहे. मला असं वाटतं की तुम्ही कुठेही बसून कमेंट करता आणि बोलता हे खूप वाईट आहे. माणूस म्हणून आपण काय करू शकतो तर एकमेकांशी चांगलं वागू शकतो. आणि महिलांवर होणारी टीका तर वाईटच आहे.मीही ते अनुभवलं आहे कारण जेव्हा मी सुरुवात केली होती तेव्हा मी १७ वर्षांची होते आणि आता मी त्याच्या दुप्पट वयाची आहे.”
ती पुढे म्हणाली, “त्यामुळे स्पष्टपणे सांगायचं तर मी मुलगीची बाई टेलिव्हिजनवरच झाले आहे. त्यामुळे मध्ये एक असा काळ असतो की तुमचं वजन वाढतं. जेव्हा माझंही वजन वाढलं होतं. तेव्हा माझंही खूप ट्रोलिंग झालं होतं. पण आता सुदैवाने माझ्या आजु-बाजूची माणसं खूप चांगली आहेत. त्यामुळे तुम्ही कोणाबरोबर असता तुमच्या अवतीभोवती कशी माणसं आहेत हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्याचा मानसिक आरोग्यावर परिणाम होतो.”
हृता दुर्गुळे पुढे म्हणाली, “आता मी यासगळ्याच्या खूप पलीकडे आहे. आता कदाचित मीही गरोदर राहिल्यानंतर मलाही ट्रोल करतील, माझ्यावरही बाळ झाल्यानंतर टीका होईलच. तुम्ही किती लोकांना थांबवणार. लग्न लवकर केलं म्हणत ट्रोल केलं. त्यात शाह आडनावाच्या मुलाशी केलं त्यामुळेही ट्रोल केलं. त्यामुळे आता यावर काय बोलणार. मी आधीही याबद्दल कधी प्रतिक्रिया दिली नाही पुढेही देणार नाही आणि सुदैवाने मी सोशल मीडियावर फार सक्रीय नसते.” यावेळी तिने तिचा नवरा प्रतीक शाह अमराठी असल्याने त्याच्याशी लग्न केल्यानंतर ट्रोल केल्याचं म्हटलं आहे.
