Hruta Durgule upcoming movie: ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांतून अभिनेत्री हृता दुर्गुळेला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. अनन्या या सिनेमातील तिच्या कामाचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.
कन्नी, कमांडर करण सक्सेना, आरपार या सिनेमा आणि वेब सीरिजमधील तिच्या भूमिकांनी लक्ष वेधले होते. याबरोबरच, नाटकांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येते. सध्या तिची प्रमुख भूमिका असलेली ‘अगं आई अहो आई’ या झी ५ मराठीवरील वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. या सीरिजमध्ये हृताबरोबर रेणुका शहाणे व निर्मिती सावंत प्रमुख भूमिकेत आहेत. सध्या ही वेब सीरिज चर्चेत असून कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे.
आता हृता एका नवीन कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ही कलाकृती नेमकी कोणती, तिच्याबरोबर प्रमुख भूमिकेत कोण असणार, तसेच ही कलाकृती कुठे प्रदर्शित होणार याबद्दल जाणून घेऊ…
हृताने सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टरवर ती व तिच्याबरोबर सारंग साठ्ये दिसत आहे. या पोस्टरवरील तिचा फोटो लक्ष वेधून घेत आहे. हृताने शाळेचा ड्रेस घातला आहे. गळ्यात टाय, दोन वेण्या आणि चेहऱ्यावर हसू असा तिचा लूक आहे. सारंगदेखील हसत असल्याचे दिसत आहे. त्याच्या कानावर जास्वंदीचे फुल अडकवले आहे आणि त्याने हृताचे कान धरले आहेत. विशेष म्हणजे हृताचे कान मोठे आहेत. तिचे हे कान लक्ष वेधून घेत आहेत. याच पोस्टरवर कलाकृतीचे नावदेखील आहे. आली मोठी शहाणी असे नाव आहे.
“लहान असो वा मोठा आपण सगळेच बाप्पाकडे…”
हे पोस्टर शेअर करताना हृताने लिहिले, “लहान असो वा मोठा आपण सगळेच बाप्पाकडे काही ना काही मागत असतो. तोही मोठ्या मनाने आपल्याला नेहमी मदत करत असतो.”
तिने पुढे लिहिले, “आपलीशी वाटणारी एक हलकी-फुलकी आणि निरागस गोष्ट आहे. ‘आली मोठी शहाणी’ सिनेमा २ ऑक्टोबर २०२६ पासून सर्व सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.” हृताने लिहिलेल्या कॅप्शनवरुन हा सिनेमा असल्याचे समोर आले आहे. सिनेमाचे दिग्दर्शन आनंद गोखलेंनी केले आहे.
सिनेमात सारंग व हृता यांच्याबरोबर मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय कलाकार दिसणार आहे. ऋजुता देशमुख, मैत्रयी दाते, सुहिता थत्ते, गुरू ठाकूर, विशाखा नाईक, प्रशांत कुलकर्णी हे कलाकार सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. आता हृताची ही नवीन भूमिका प्रमुख प्रेक्षकांना आवडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
