इंडस्ट्रीत राजकारण, भेदभव, कंपूशाही यांसारख्या गोष्टी घडत असतात असं अनेक जण म्हणताना दिसतात.अशातच आता लोकप्रिय अभिनेत्री ईशा केसकरनेही याबद्दल बोलताना खुलासा केला आहे. ईशाने आतापर्यंत मराठी मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. अशातच आता अभिनेत्रीने इंडस्ट्रीतील राजकारणाबद्दल सांगितलं आहे. यावेळी तिने इंडस्ट्रीत जातीयवादही असल्याचा खुलासा केला आहे.

ईशा केसकर अशा कलाकारांपैकी आहे जे अनेकदा मोकळेपणाने आणि स्पष्टपणे त्यांची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच आता तिने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तिला इंडस्ट्रीत राजकारण केलं जातं का असं विचारल्यानंतर तिने राजकारण तर होतचं पण खूप मोठ्या प्रमाणात जातीयवादही आहे असा खुलासा केला आहे.

इंडस्ट्रीत राजकारण, जातीयवाद आहे – ईशा केसकर

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत ईशाला याबद्दल विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो आहे. ते आपआपल्या परीने राजकारण करत असतात. जातीयवादसुद्धा आहे. खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक गोष्टीत राजकारण केलं जातं.” ईशाला पुढे या गोष्टींचा कास्टिंगवर परिणाम होतो का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “हो मला तर वाटतं. मी तर दिग्दर्शखाला खूप प्रश्न विचारते. नुकताच एक चित्रपट माझ्याकडे आला होता त्यात मला अवयवांच्या तस्करीबद्दल बोलायचं होतं. त्यावेळी मी त्यांना खूप प्रश्न विचारले होते.”

ईशाला पुढे फक्त काम मिळवण्यासाठी जरा चांगलं किंवा समोरच्या व्यक्तीशी आवाज कमी करुन बोलली आहेस का असं विचारल्यानंतर ती म्हणाली, “मी याच्या खूप पलिकडे आहे. तुम्ही मला माणूस म्हणून आवडला पाहिजे, जी कथा आहे त्यात जीव असला पाहिजे तरंच मी तो चित्रपट स्वीकारते. मालिकेचं सांगायचं त्यात या गोष्टी नसतात म्हणूनच आम्ही जास्त पैसे घेतो.”

दरम्यान, ईशाने या मुलाखतीत अनेक गोष्टींबद्दलची तिची मतं व्यक्त केली आहे. यावेळी तिने प्रश्न विचारणारी अभिनेत्री नको असते असं म्हटलं आहे. इशा सध्या ‘समर्थ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. येत्या १४ ऑगस्टला ईशाचा हा चित्रपट सिनेमागृहात रिलीज होणार आहे.