महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ‘येक नंबर’ चित्रपट येत्या १० ऑक्टोबरला प्रदर्शित होत आहे. ‘येक नंबर’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. अभिनेता धैर्य घोलप या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. नुकतंच ‘येक नंबर’ चित्रपटात प्रेमगीत प्रदर्शित झालं आहे.
अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि वरदा नाडियावाल यांनी ‘येक नंबर’ चित्रपटाची निर्मितीची धुरा सांभाळली आहे. तर राष्ट्रीय पुरस्कार विजेते राजेश मापुस्कर यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात धैर्य घोलपसह अभिनेत्री सायली पाटील पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील दोघांचं प्रेमगीत आता प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. “जाहीर झालं जगाला…” असं प्रेमगीताचं नाव असून संगीत क्षेत्रातील सुप्रसिद्ध जोडी अजय-अतुलने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
“प्रेम जे पाण्याइतकं नितळ आणि आभाळा एवढं विशाल असतं…असं प्रेम तुमच्यावर कोणी करायला लागलं ना लय भारी वाटतं…एकदम येक नंबर…” या सुंदर डायलॉगने गाण्याची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. पिंकी आणि प्रतापमधील रोमँटिक क्षण या गाण्यात आहेत. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी हे गाणं गायलं आहे. तर ‘स्वप्नातल्या चांदण्याचं…लागीर झालं जीवाला…झाकून होतं मनाशी…जाहीर झालं जगाला’ या सुंदर ओळी गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिल्या आहेत.
‘येक नंबर’ चित्रपटातील ‘जाहीर झालं जगाला…’ या प्रेमगीताला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अवघ्या काही तासांत युट्यूबवर या गाण्याला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. अजय गोगावले आणि श्रेया घोषालच्या आवाजाच कौतुक केलं जात आहे. एका युजरने लिहिलं आहे की, “किती शॉर्ट आणि सिम्पल गाणं आहे. डोक्यातून अजून चाल जात नाहीये.” तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे, “हे गाणं खूप छान आहे. गाण्याचे बोल लक्षवेधी आहेत.” अशा प्रकारे अनेक जण गाण्याचं कौतुक करत आहेत.
हेही वाचा – “वाइल्ड कार्ड एन्ट्री…”, संग्राम चौगुलेवर टीका करत मराठी अभिनेत्याने अरबाजचं केलं कौतुक, म्हणाला…
दरम्यान, दसऱ्याच्या औचित्यावर ‘येक नंबर’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. निर्माती तेजस्विनी पंडित या चित्रपटाविषयी म्हणाली होती की, “प्रेक्षकांची अनेकदा तक्रार असते की, मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. या सगळ्याचे श्रेय या चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जाते.”