आजवर आपण हॉलीवूड आणि बॉलीवूडमध्ये ‘युनिव्हर्स’ संकल्पनेवर आधारित अनेक चित्रपट पाहिलेले आहेत. पण, आता मराठीत सुद्धा हा प्रयोग पहिल्यांदाच यशस्वीरित्या साकारण्यात आला आहे. हा अनोखा प्रयोग प्रेक्षकांना ‘घबाडकुंड’ सिनेमात पाहायला मिळेल. हा चित्रपट येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या महिन्याभरापूर्वी यामध्ये दमदार भूमिका साकारणाऱ्या एका अभिनेत्याचा फर्स्ट लूक नुकताच समोर आला आहे.
मराठीसह हिंदी आणि तेलुगू मनोरंजनविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवलेला लोकप्रिय अभिनेता देवदत्त नागे ‘घबाडकुंड’ सिनेमात झळकणार आहे. झी मराठीवरील ‘जय मल्हार’ या पौराणिक मालिकेमुळे देवदत्तला घराघरांत लोकप्रियता मिळाली. आता तो एका नव्या रुपात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागेचा ‘घबाडकुंड’ चित्रपटातील लूक सध्या विषय ठरत आहे.
आतापर्यंत ‘आदिपुरुष’मधील हनुमंत, ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’मधील सूर्याजी मालुसरे, ‘सत्यमेव जयते’मधील इन्स्पेक्टर शंकर गायकवाड, तसेच ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा’ मधील पोलीस अधिकाऱ्याची भूमिका आणि तेलगू चित्रपट ‘कमसराजू’ मधील ‘देवकी नंदन वासुदेवा’सारख्या विविध व्यक्तिरेखा त्याने साकारल्या आहेत. देवदत्तने प्रत्येक भूमिकेत नवं काहीतरी सादर करत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता मात्र देवदत्त एका पूर्णपणे नव्या आणि अनपेक्षित अवतारात प्रेक्षकांसमोर येण्यासाठी सज्ज झाला आहे.
‘घबाडकुंड’ चित्रपटात तो ‘खंग्री’ची भूमिका साकारेल. देवदत्तच्या खंग्री भूमिकेचा रांगडेपणा आणि त्याचा गूढ लूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तीक्ष्ण नजर आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्समुळे त्याच्या या व्यक्तिरेखेभोवती रहस्यमय आकर्षण निर्माण झालं आहे.
या चित्रपटासाठी त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वात केलेला बदल, त्यासाठी घेतलेली मेहनत यातून देवदत्तचा हा लूक अधिक प्रभावी ठरणार असल्याची चर्चा रंगली आहे. काहीतरी वेगळं सादर करण्याची देवदत्त नागे यांची खासियत या नव्या अवतारातूनही ठळकपणे दिसून येत आहे. प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच या चित्रपटाबद्दल उत्सुकता असून, देवदत्त नागे यांच्या या दमदार लूकमुळे चित्रपटाची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दरम्यान, ‘घबाडकुंड’मधून प्रेक्षकांना एक वेगळाच थरार अनुभवायला मिळणार आहे. कल्पनेच्या पलीकडचं ‘युनिव्हर्स’ मोठ्या पडद्यावर साकारण्याचा धाडसी प्रयत्न दिग्दर्शक प्रितम एस. के. पाटील यांनी केला आहे. निर्माते डॉ. रसिक कदम यांची भक्कम साथ या चित्रपटासाठी लाभली आहे. हा सिनेमा येत्या १९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
