Jaywant Wadkar’s wife on Son-In-Law Varun: ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर आणि त्यांच्या कुटुंबाने एका मुलाखतीत श्री स्वामी समर्थांवर असलेल्या भक्तीबद्दल सांगितले. तसेच, जयवंत वाडकर यांच्या पत्नीने मुलगी व जावयाबद्दलही वक्तव्य केले.
“स्वामिनी ही स्वामी समर्थांच्या नवसाने झालेली मुलगी आहे, म्हणून…”
‘अभिजात मराठी फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत जयवंत वाडकर यांची पत्नी जावयाबद्दल म्हणाल्या, “वरुणचं एक वैशिष्ट्य सांगते की वरुण केरळचा आहे, मल्याळी आहे. पण, तो स्वामी समर्थ यांचा परमभक्त आहे.”
त्या असेही म्हणाल्या, “आमची मुलगी स्वामिनी ही स्वामी समर्थांच्या नवसाने झालेली मुलगी आहे, म्हणून तिचं नाव स्वामिनी आहे. तिचं बारसं आम्ही दादरच्या मठामध्ये केलं आहे. मी देवाला म्हणाले होते की मी तुझंच नाव मुलीला देईन. जेव्हा माझी डिलिव्हरी झाली तेव्हा जयवंत शूटिंग करत होता. त्याने मला फोन करून सांगितलेलं की मुलगी झाली नाही तर तू तिथेच राहा. कारण त्यांना सख्खी बहीण नाही, त्यामुळे त्यांना मुलगी हवी होती.
पुढे त्या म्हणाल्या, “वरुण स्वामिनीच्या आयुष्यात आल्यानंतर स्वामींनी स्वामीच्या भक्ताला जोडलं असं मला वाटतं. वरुणमुळे आम्ही सतत अक्कलकोटला जायला लागलो. म्हणजे महिन्यातून दोन-तीन वेळा अक्कलकोटला गेलेलो आहे.” वरुण व स्वामिनी यांचे लग्न मे २०२६ मध्ये पार पडले आहे.
दरम्यान, जयवंत वाडकर ‘मैत्रेया’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
