Jitendra Joshi Namrata Shirodkar Movie Experience: मराठी सिनेविश्वातील अष्टपैलू अभिनेते जितेंद्र जोशी यांनी अनेक वर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षांपासून जितेंद्र जोशी हे सिनेविश्वामध्ये झळकत आहेत. नाटक, सिनेमा आणि बॉलीवूड अशा माध्यमांमध्ये काम करणाऱ्या जितेंद्र जोशी यांनी अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे.

अभिनेते जितेंद्र जोशी यांनी करिअरच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या सिनेमामध्ये नम्रता शिरोडकर यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. महेश मांजरेकर यांनी संधी दिल्यामुळे हे काम मिळाल्याचे जितेंद्र जोशी यांनी सांगितले. अमोल परचुरे यांच्या पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीमध्ये जितेंद्र जोशी यांनी नम्रता शिरोडकर यांच्याबरोबर काम करताना आलेले दडपण आणि शूटिंगचे अनुभव शेअर केले आहेत.

नम्रता शिरोडकरबाबत काय म्हणाले जितेंद्र जोशी?

    जितेंद्र जोशी म्हणाले, “मी नम्रता शिरोडकर यांच्याबरोबर काम केलं तेव्हा अगदी भाबडं वय होतं. नम्रता शिरोडकरच्या समोर आपण काम करतोय हे खूप चांगलं वाटलं होतं, पण त्यावेळी मी खूप घाबरलो होतो. त्यानंतर माझी व नम्रता शिरोडकर यांची परत कधीच भेट झाली नाही. पण त्या जिथे कुठे असतील, मी त्यांना मनापासून प्रणाम करतो.”

    पुढे ते म्हणाले, “मी त्यावेळी ‘मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी’ हे नाटक करत होतो. ते पाहण्यासाठी महेश मांजरेकर आले होते. ते मला म्हणाले, ‘अरे, मी तुला नम्रता शिरोडकरच्या बरोबर पिक्चर देतो,’ त्यावेळी मला असं वाटलं की, हे काय चाललंय आपल्या आयुष्यात. नम्रता शिरोडकर म्हणजे अत्यंत सौंदर्यवान स्त्री आणि खूप सुंदर व्यक्ती आहे. फक्त नाकी, डोळे आणि देहाने नाही तर मनानेही सुंदर आहे.”

    नम्रता शिरोडकर

    जितेंद्र जोशी म्हणाले, “त्यावेळी जे शूटिंग केलं ते विसरणं शक्य नसतं. इतका मोठा स्टार आपल्यासमोर आहे, याचं त्यावेळी एक वेगळच दडपण असतं. त्यावेळी ते स्टार आपल्याबरोबर कसं वागतात ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतं.”

    दरम्यान, जितेंद्र जोशी नुकतेच ‘दायरा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात करीना कपूर खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. तसेच मराठमोळी क्षिती जोगही या सिनेमात दिसली.