Jitendra Joshi on actor craft and their opinion: नाटक, मराठी-हिंदी सिनेमे, कविता या माध्यमातून जितेंद्र जोशींनी कायमच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत. आता जितेंद्र जोशींचे वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे.
जितेंद्र जोशी कॅचअप या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या मुलाखतीतील त्यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे.
“…पण नट म्हणून त्यांचं नटपण कसं हिरावणार?”
अमोल परचुरेंना दिलेल्या मुलाखतीत जितेंद्र जोशी म्हणाले, “आज कोणाच्याही कुठल्याही बाबतीत बोललं तर बाकीचे जे सगळे येतात आणि आपण ज्यावर बोललोय त्यावर चर्चा करतात, बोलतात; पण अभिनेत्याची त्याची त्याची म्हणून जी काही मतं आहेत, राजकीय-धार्मिक मतं असतील ती बाजूला ठेवून कलाकाराकडे बघितलं पाहिजे, तुम्ही क्राफ्ट तर दूर करू शकत नाही.”
“नसरुद्दीन शाह आणि विक्रम गोखले यांची…”
पुढे ते म्हणाले, “नसरुद्दीन शाह आणि विक्रम गोखले यांची धर्माविषयी मतं अत्यंत भिन्न होती. नसरुद्दीनजी आहेत, विक्रम काका होता, पण नट म्हणून त्यांचं नटपण कसं हिरावणार? नाना पाटेकर फेरीवाल्यांविषयी काय बोलतात आणि इतर विषयांवर काय बोलतात हा मुद्दा वेगळा आहे. पण, जेव्हा नाना पाटेकर अभिनयासाठी उभे राहतात, तो क्राफ्ट त्या माणसाने त्याचा त्याचा कमावलेला आहे. मग तुम्ही नटाचं नटपण बघणार, त्याच्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा घुसणार. कारण- हे क्षेत्रच तसं आहे”, असे म्हणत जितेंद्र जोशींनी कलाकार जेव्हा त्यांची मतं व्यक्त करतात त्याची चर्चा होते, याबद्दल त्यांचे मत मांडले.
दरम्यान, जितेंद्र जोशी नुकतेच ‘दायरा’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमात करीना कपूर खान महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. तसेच, मराठमोळी क्षिती जोगही या सिनेमात दिसली.
