Riteish Deshmukh : रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ सिनेमाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. यामध्ये लोकप्रिय मराठी अभिनेता जितेंद्र जोशीने ‘पंताजी गोपीनाथ बोकील’ ही भूमिका साकारलीये. सुरुवातीला ही भूमिका एका वेगळ्या मराठी कलाकाराला ऑफर करण्यात आली होती. पण, संबंधित कलाकाराची एक अडचण निर्माण झाल्यामुळे पुढे, ऐनवेळी रितेशने जितेंद्र जोशीला या भूमिकेसाठी फोन केला होता. जितूने कसलाही विचार न करता या भूमिकेसाठी लगेच होकार दिल्याचं रितेशने ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान सांगितलं होतं. याबाबत आता जितेंद्र जोशीने सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र जोशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतो, “खरंतर एका दिवसात सुद्धा नाही…मी त्यांचा फोन आल्यावर लगेच होकार दिला. मला सायंकाळी ५:३० वाजता त्यांचा फोन आला होता. मला त्यांनी दोन प्रश्न विचारले, कुठे आहात? ‘म्हटलं मुंबईत…’ पुढचे, काही दिवस काय करताय? ‘म्हटलं, काही नाही…’; आता अनेकांना असं वाटलं असेल की, रितेश सरांनी आधी हिंदी कलाकाराला ही भूमिका विचारली असेल मग, त्याने नकार दिल्यावर मला विचारलं. पण, असं काहीही नाहीये. एका उत्तम मराठी कलाकाराला या भूमिकेसाठी विचारलं होतं. पण, खरंच काहीतरी अडचण होती म्हणून त्यांना शक्य होणार नव्हतं. म्हणून मग भाऊंनी मला फोन केला. तर, संध्याकाळी फोन आला ते म्हणाले उद्या शूट आहे. लूक टेस्टसाठी लगेच यायला सांगितलं. सेटवर पोहोचल्यावर मला समजलं की, महाराजांच्या वकिलाची भूमिका आहे पंताजी गोपीनाथ बोकील.”
“आता त्या भूमिकेसाठी मला टक्कल करायचं होतं…पण, मी म्हणालो आता टक्कल नाही करता येणार…मग, वीग लावायचं असं ठरलं. त्यासाठी मला सव्वा दोन तास लागले. म्हणजे बघा…संध्याकाळी फोन आला, लगेच मी सेटवर गेलो आणि लूकटेस्ट झाली. शूटिंग दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता सुरू होणार होतं आणि माझा कॉल टाइम पहाटे साडेचार वाजताचा होता. मी त्यांना म्हणालो, ‘भाऊ व्हॅनिटी इथेच उघडा…इथेच झोपतो, कशाला घरी जाऊ?’ मला भूमिकेची तयारी वगैरे करण्यासाठीही फार वेळ मिळाला नव्हता. पण, रितेश भाऊंच्या मनात ती भूमिका फार सुस्पष्ट होती.” असं जितेंद्र जोशीने सांगितलं.
रितेश काय म्हणाला होता?
“मी त्यांना अगदी आदल्या दिवशी संध्याकाळी फोन केला होता. मग त्यांना सगळं सांगितलं, म्हटलं मी अडकलोय…मला मदत पाहिजे. एक भूमिका आहे…फार महत्त्वाची भूमिका आहे. उद्याच शूटिंग करावं लागेल, आणि आता रात्री लूक टेस्ट वगैरे होईल. ते समोरून लगेच म्हणाले… Done! त्या माणसाने एका फोनवर माझ्यासाठी इतकं करणं…ही खूप मोठी गोष्ट आहे.” यामुळे रितेश देशमुखने जितेंद्र जोशी यांचे आभार मानले होते.
