Jitendra Joshi : अभिनेता जितेंद्र जोशीने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘दायरा’ सिनेमात बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरबरोबर काम केलंय. तर, अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘बंदर’ चित्रपटात जितेंद्रला बॉबी देओलसह स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली होती. बॉलीवूडच्या या स्टार कलाकारांबरोबर काम करतानाचा अनुभव आणि दिग्दर्शकांच्या कामाची पद्धत, तसेच करिअरच्या सुरुवातीला अंकुश चौधरीने दिलेला खास किस्सा याबाबत जितेंद्रने अमोल परचुरे यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
जितेंद्र जोशी सांगतो, “आता अनेक वर्षे काम केल्याने त्यांच्या स्टारपणाचं दडपण आता येत नाही. पण, या कलाकारांचा अप्रोच कसा असेल याचा विचार असतो. अनुराग कश्यप यांनी ‘बंदर’ सिनेमाच्या एका सीनवेळी मला सांगितलं होतं, याची रिहर्सल नको करूस…एकदा वाच आणि विसरून जा. तू तुला जसं वाटतंय तसं कर. पण, त्यावेळी बॉबी देओलचा मॅनेजर आला आणि म्हणाला, ‘सर ( बॉबी देओल ) म्हणत आहेत रिहर्सल करूयात आणि इकडे कश्यप म्हणताहेत रिहर्सल नको. मग, मी अनुराग कश्यप यांना म्हटलं, एकदा आम्हाला दोघांना बोलून घेऊद्यात.”
जितेंद्र पुढे म्हणाला, “त्यानंतर मग मी आणि बॉबी देओल एका ठिकाणी आलो…सीनबाबत चर्चा केली. त्या सीनचे एकूण तीन टेक झाले आणि तिसऱ्या टेकला ते रडूच लागले. ते सिनेमात ठेवलेलं नाहीये, पण तेव्हा बॉबी देओल यांनी सीन करताना खूप छान रिस्पॉन्ड केलं. एकीकडे अनुराग कश्यप यांच्यासारखा दिग्दर्शक आहे जो म्हणतो, तुम्हाला हवा तसा सीन इम्प्रोवाइज करा. तर, दुसरीकडे मेघनाजी गुलजार मॅडम आहेत. त्या स्क्रिप्टमधला शब्दही इकडचा तिकडे करत नाहीत. तर, अनुराग कश्यप आणि मेघना गुलजार हे दोघंही असे भिन्न, वेगळे दिग्दर्शक आहेत. पण, या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळतेय, हिच चांगली गोष्ट आहे.”

अंकुश चौधरीने दिलेला खास सल्ला
“खरंतर, हीरो व्हायची मला कधीच घाई नव्हती. रादर मी कधी हीरो होईन असंही मला वाटलं नव्हतं. अंकुश चौधरी आणि मी आम्ही अनेक वर्षांपूर्वी ‘आयला रे’ नावाचा सिनेमा केला होता. त्यादरम्यान, आम्ही दोघं साऊथचा एक सिनेमा पाहत होतो. अंकुशने तो चित्रपट पाहताना मला सिनेमातील एका कलाकाराबद्दल विचारलं, ‘तुला काय वाटतं हा कोण असेल?’ मी म्हटलं होतं, हा साइड हीरो असेल. अंकुश म्हणाला, तोच चित्रपटाचा हीरो आहे. याच्यापेक्षा तर तू नक्कीच सुंदर दिसतोस. दिसण्यावर काहीही नसतं…तू स्वत: ठरवायचं असतं…एकदा आपण आपल्या मनात ठरवलं की आपण हीरो असतो. तर, सांगायचा मुद्दा असा की, अशा बऱ्याच लोकांकडून मला बऱ्याच गोष्टी शिकता आल्या.” असं जितेंद्रने सांगितलं.
