मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणून जितेंद्र जोशीला ओळखलं जातं. काही वर्षांपूर्वी ‘नेटफ्लिक्स इंडिया’च्या पहिल्या वहिल्या ओरिजिनल वेब सीरिजच्या माध्यमातून जितेंद्र जोशी ‘काटेकर’च्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. अनुराग कश्यपच्या ‘सेक्रेड गेम्स’मध्ये त्याने खूप प्रभावी पात्र साकारलं होतं.

आताच्या काळातील प्रत्येक कलाकाराला आपण अनुराग कश्यपबरोबर काम करावं असं वाटतं. काही वर्षांपूर्वी ‘सेक्रेड गेम्स’च्या निमित्ताने जितेंद्र जोशीचं हे स्वप्न पूर्ण झालं. त्याने सोशल मीडियावर अनुरागसाठी एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या पोस्टसह जितेंद्रने दिग्दर्शकाबरोबरचा एका सेल्फी सुद्दा जोडला आहे.

हेही वाचा : मुहूर्त ठरला! अनंत-राधिका ‘या’ दिवशी घेणार सात फेरे, लग्नपत्रिकेचा पहिला फोटो आला समोर, अंबानींकडे ३ दिवस होणार कार्यक्रम

जितेंद्र जोशी लिहितो, “एक काळ असा होता जेव्हा मला बकेट लिस्ट म्हणजे काय? हे माहिती नव्हतं. पण, एक गोष्ट कायम लक्षात होती ती म्हणजे, ज्याने रामूजींनंतर चित्रपटांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. ज्याने आजच्या काळात आपण असे चित्रपट बनवू शकतो हे केवळ मुलाखतींमध्येच नव्हे तर प्रत्यक्ष चित्रपट बनवून या गोष्टी सिद्ध केल्या….असे हे अनुराग कश्यप. यांच्याबरोबर काम करायचं. ते स्वत: एक हुशार आणि अप्रतिम लेखक आहेत. त्यांना मी जवळपास २२ वर्षांपासून बघत आलोय…आमची एकमेकांबरोबर ओळखही होती. परंतु, कधीच “सर, तुमच्याबरोबर काम करायचंय” असं सांगण्यासाठी माझं धाडस झालं नाही. पण, कुठे ना कुठे मनात एक गोष्ट जाणवत होती की एक दिवस नक्की येणार आणि मी त्यांच्याबरोबर काम करणार…”

“भूमिका लहानशी होती आणि ३ दिवसांचं शूटिंग होतं. पण, त्या २२ वर्षांचा विचार केला तर कसालाच हिशोब पूर्ण होणार नाही. त्यांच्याबरोबर काम करण्याची माझी तीव्र इच्छा होती. आजच्या काळात लोक प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क सांगतात पण, अनुराग कश्यप यांच्या बाबतीत अनेक गोष्टी वेगळ्या आहेत. ते प्रत्येकाला स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा देतात. माझ्या मनात समाधान आहे की, मी अभिनेता होण्याचा निर्णय घेतला नाहीतर मला हा अनुभव पुन्हा कधीच घेता आला नसता. आपल्या मनातील उत्साह आणि स्वत:मधलं ते लहान मुलं कायम जपा. कारण, तुम्हाला तुमचा अनुराग तुमच्या स्वत:च्या मनात किंवा बाहेर कुठे ना कुठे नक्कीच सापडेल. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. तुम्ही नक्की काय आहात हे तुम्हाला कधीच कळू नये अशी माझी इच्छा आहे.” अशी पोस्ट जितेंद्र जोशीने अनुराग कश्यपसाठी शेअर केली आहे.

हेही वाचा : अधिपतीच्या खऱ्या आयुष्यातील मास्तरीण बाईंना पाहिलंत का? लग्नाला पूर्ण झाली ७ वर्षे, शेअर केला फॅमिली फोटो

दरम्यान, जितेंद्र जोशीच्या या पोस्टवर अनुराग कश्यपने “मजा आ गया साथ काम करके” अशी कमेंट केली आहे. यावर जितेंद्र जोशीने “बहुत ज्यादा…” असं उत्तर दिलं आहे. नेटकऱ्यांनी सुद्धा या पोस्टवर कमेंट्स करत जितेंद्र जोशीला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.