Jui Bhagwat Konkan Video: पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांबद्दल प्रेक्षकांच्या मनात कायमच उत्सुकता असते. खऱ्या आयुष्यात ते कसे असतील, त्यांची जीवनशैली कशी असेल, त्यांचे मित्र मैत्रिणी, कुटुंब या सगळ्याबद्दलच चाहत्यांच्या मनात उत्सुकता असते. काही वेळा मुलाखतीतून कलाकार त्यांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगतात, खुलासे करतात. तर अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेता येतात.
अनेक कलाकार सोशल मीडियावर विविध फोटो, व्हिडीओ शेअर करतात. काही वेळा डान्स, विनोदी, ट्रेडिंग रील्स शेअर करतात. काही वेळा त्यांना आलेले अनुभव, सेटवरची धमाल, काही वेळा खासगी आयुष्यातील खास क्षणही शेअर करतात. चाहतेही त्यांच्या पोस्ट, व्हिडीओवर कमेंट्स करत त्यांची मते मांडतात. कलाकारांचे कौतुक करतात. सोशल मीडियावरील पोस्टच्या माध्यमातून कलाकारांच्या आयुष्याची झलक पाहायला मिळते.
अभिनेत्री दिप्ती बर्वे भागवतने शेअर केला लेकीचा व्हिडीओ
आता अभिनेत्री जुई भागवतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. जुईचा नुकताच वाढदिवस झाला. या निमित्ताने जुईची आई अभिनेत्री दिप्ती बर्वे भागवतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की जुई शेणाने घर सारवत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला पाहायला मिळते की, जुईच्या पुढे शेण आहे. दिप्ती तिला विचारते की जुई हे काय केले आहे? त्यावर जुई म्हणते शेण गादवून झाले आहे. त्यावर दिप्ती तिला विचारते की, म्हणजे काय? त्यावर जुई म्हणते की शेण सुकलेलं होतं, त्याला मी ओलं करून घेतलं आहे. त्याला आता आपण चांगल्या प्रकारे सारवून घेऊ. त्यावर दिप्ती तिला विचारते की तुला सारवता येतं का? त्यावर जुई हो म्हणते. त्यानंतर ती जमीन शेणाने सारवताना दिसत आहे.पुढे दिप्ती तिला विचारते की कधी शिकलीस तू? त्यावर जुई चिपळूणला असे म्हणाली.
व्हिडीओमध्ये पुढे जुई आणि तिचे आजोबा शिट्टी वाजवताना दिसत आहेत. ते झोपाळ्यावर बसले असून त्यांच्यामागे पाऊस पडताना दिसते. पुढे जुईने वेणी घातली असून केसांत फूल लावलेले दिसत आहे. एका फोटोत साडी नेसलेली असून गजरा माळलेला दिसत आहे. तर पावसाच्या पाण्याबरोबर खेळताना दिसत आहे. व्हिडीओच्या शेवटी कुटुंबाबरोबर गोड फोटो दिसत आहे.
हा फोटो शेअर करताना दिप्तीने लिहिले, “कोकणातली अस्सल कोकणी जुई.वाढदिवसाच्या निसर्गसंपन्न शुभेच्छा जुजू. आपल्या मातीशी आणि आपल्या माणसांसोबतची तुझी नाळ अशीच दृढ होत राहो. खूप खूप प्रेम आणि अनेकानेक आशीर्वाद.” दिप्तीच्या या पोस्टवर जुईने, थँक्यू मम्मा असे लिहिले आहे. तसेच अनेकांनी जुईचे कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.
दरम्यान, झापुक झुपूक, लाइक अँड सबस्क्राइब, मॅजिक, गुलकंद, तुमची मुलगी काय करते या टीव्ही मालिका आणि चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.
