Kapuskoonda Marathi Movie Sachin Pilgaonkar-Madhurani Gokhale: माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच सोशल मीडियावर लॉन्च करण्यात आली आहे. येत्या २३ ऑक्टोबरला ‘कापूसकोंडा’ चित्रपट प्रदर्शित होणार असून, याची पहिली झलक पाहूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर व ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्या या सिनेमा प्रमुख भूमिका असणार आहेत. या दमदार कलाकारांसह नवीन पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचं बरंच चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आलेलं आहे. सचिन पिळगांवकर यांच्या ‘नवरा माझा नवसाचा’ या चित्रपटात मधुराणी गोखलेने ‘कँडी’ (VJ Candy) ही मजेशीर भूमिका साकारली होती. आता ‘कापूसकोंडा’च्या माध्यमातून सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले ही जोडी बऱ्याच वर्षांनी पुन्हा एकत्र आली आहे.

‘कापूसकोंडा’ चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांचं आहे. तर, या चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. ‘कापूसकोंडा’ चित्रपटाची कथा अत्यंत अनोखी आहे. मानवी नाते संबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित ही हळवी गोष्ट प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणारी आहे.

या सिनेमाची पहिली झलक पाहिली असता, ‘कापूसकोंड्याची गोष्ट ऐकली का?’ अशा व्हॉइसओव्हरनंतर मधुराणी गोखले आणि दोन मुली आश्चर्याने पाहताना दिसतात, त्यानंतर भांडीकुंडी सर्वत्र पसरलेल्या खोलीत सचिन पिळगावकर, मांडीवर कुत्रा असल्याने भेदरलेले दिसतात. त्यामुळे या दोन प्रसंगांतूनच कथानकाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे यात शंका नाही.

येत्या २३ ऑक्टोबरला हा दमदार ‘कापूसकोंडा’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेटकऱ्यांनी या सिनेमाची पहिली झलक पाहूनच टीमवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.