मानवी नातेसंबंध, कुटुंब, भावभावनांवर आधारित असा ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे. येत्या २३ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार असून, ही गोष्ट सत्यघटनेवरून प्रेरित आहे. ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केलं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नवीन पिढीतील कलाकार अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि भूषण पाटील अशी दमदार स्टारकास्ट आहे.

राजा, राणी आणि त्यांच्या दोन राजकुमारी अशी ही हॅपी गो लकी फॅमिलीची रंजक गोष्ट आहे. निवृत्त कर्मचारी आणि त्याला भेट म्हणून मिळालेला श्वान यांच्या नात्यावर आधारित ही गोष्ट आहे. ‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन या टीझरला देण्यात आली आहे. तसेच सत्यघटनेवरून ही कथा प्रेरित असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

आता एका श्वानामुळे काय-काय घडामोडी घडतात? मानवी भावभावना, नातेसंबंध कशा पद्धतीनं उलगडत जातात हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. टीझरने चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता वाढवली आहे. उत्तम कथानकाला तितक्याच सक्षम अभिनयाची जोड असल्यानं हा चित्रपट मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे.

सचिन पाटेकर यांनी या सिनेमाच्या छायांकनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटाच्या गाण्यांना गायक अवधूत गुप्ते, पद्मनाभ गायकवाड यांचा स्वरसाज लाभला आहे. सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिलं आहे. चित्रपटाचं बरंच चित्रीकरण कथानकाची गरज समजून लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावी करण्यात आलं आहे. ‘कापूसकोंडा’ या चित्रपटातून सचिन पिळगांवकर आणि मधुराणी गोखले बऱ्याच काळानंतर पुन्हा एकत्र आले आहेत. यापूर्वी हे दोघं ‘नवरा माझा नवसाचा’ हा एव्हरग्रीन सिनेमात एकत्र झळकले होते. येत्या २३ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.