Kartiki Gaikwad Marriage : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमुळे कार्तिकी गायकवाड घराघरांत लोकप्रिय झाली. ती या सीझनची महाविजेती ठरली होती. कार्तिकीने तिच्या सुमधूर आवाजाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. अशी ही प्रेक्षकांची लाडकी गायिका वैयक्तिक आयुष्यात डिसेंबर २०२० मध्ये लग्नबंधनात अडकली. कार्तिकीच्या पतीचं नाव आहे रोनित पिसे. या दोघांचं अरेंज मॅरेज असून, या दोघांचं लग्न कसं जमलं याबद्दल कार्तिकीने सावनी रविंद्रला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
कार्तिकी सांगते, “माझ्या बाबांनी योग्यवेळी… माझ्या आयुष्यातील सगळे निर्णय घेतले आणि बाबा जे करतील ते योग्यच असेल यावर माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मी प्रत्येक गोष्टीत निर्धास्त होते. मग ते लग्न असो किंवा करिअर… लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, सुरुवातीला मला असं वाटायचं अरे, आई-बाबांना सोडून आपण कसं काय राहणार…मला सगळी जबाबदारी जमेल का? असे विचार डोक्यात असायचे. त्यामुळे सुरुवातीला मी लग्न म्हटलं की ‘नाही-नाही’ बोलायचे.”
गायिका पुढे म्हणाली, “माझ्या ज्या सासूबाई आहेत…त्यांची आणि माझ्या बाबांची अनेक वर्षांपासूनची ओळख आहे. माझ्या सासूबाईंच्या माहेरी बाबा गाण्याचा क्लास घेण्यासाठी जायचे, तेव्हापासूनची त्यांची ओळख…त्यामुळे माझ्या सासूबाईंनी आधीपासून ‘सारेगमप’ फॉलो केलं होतं, त्यानंतर माझ्या आणि बाबांच्या एका कार्यक्रमाला सुद्धा त्या आल्या होत्या. लॉकडाऊनचे नियम जेव्हा काही प्रमाणात शिथिल झाले होते…तेव्हा सासूबाईंचा फोन आला होता. त्या म्हणाल्या, “मी किती दिवस तुम्हाला सगळ्यांना घरी बोलावतेय…जर कार्यक्रम वगैरे नसतीस तर खरंच जेवायला येऊन जा!” मग, आम्ही असंच जेवणासाठी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी रोनित सुद्धा तिथेच होते. बाबांना त्यांचं कुटुंब आवडलं, सर्व छान वाटलं. मला माझ्या सासरच्यांनी लहानपणापासूनच पाहिलं होतं…त्यामुळे माझ्या क्षेत्राबद्दल वगैरे त्यांना कल्पना होती. बाबांची अशीच इच्छा होती की, मला पुढे माझ्या सासरच्या कुटुंबीयांनी सपोर्ट केला पाहिजे.”
“रोनितकडून घरी आल्यावर बाबांनी माझ्या भावाला कौस्तुभला मला विचारायला सांगितलं की, ‘आपण ज्यांच्याकडे जाऊन आलो तो मुलगा तुला कसा वाटला?’ तेव्हा मला काहीच समजलं नाही. कारण, मी त्या विचाराने त्यांना भेटलेच नव्हते. मग, माझा होकार आल्यावर बाबांनी माझ्या सासरच्यांना फोन करून विचारलं की, “गायिका मुलगी आहे तुम्हाला चालेल का?” त्यांना लगेच समजलं की, बाबा माझ्याबद्दल विचारत आहेत… माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात तेव्हा आनंदाश्रू होते, त्या खूप खुश झाल्या. पुढे, १५ दिवसांनी तिलक सोहळा पार पडला. त्याआधी मी आणि रोनित आम्ही दोघंही एकमेकांशी बोललो नव्हतो…नंतर मग सगळ्या गोष्टी जुळून आल्या. त्यांनी माझा शो वगैरे सुद्धा पाहिला होता. लहानपणी ते मला भेटूनही गेले होते. लग्न ठरल्यावर मग त्यांनी मला हे सगळं सांगितलं.” असं कार्तिकीने सांगितलं.
