Kedar Shinde New Movie Gana Dhav Re : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदेंनी काही दिवसांपूर्वीच ‘गणा धाव रे!’ या त्यांच्या नव्या सिनेमाची घोषणा केली होती. कोकणातील पार्श्वभूमीवर उलगडणाऱ्या ‘गणा धाव रे’ चित्रपटात प्रेक्षकांना दंतकथा, भक्ती आणि माणुसकी यांच्या भावविश्वात गुंफलेली कथा पाहायला मिळणार आहे. आता गणेशोत्सवाच्या निमित्ताने केदार शिंदेंनी खास पोस्ट शेअर करत या सिनेमाची रिलीज डेट आणि कलाकारांची नावं जाहीर केली आहेत.

केदार शिंदे लिहितात, “गणपती बाप्पा मोरया! काही गोष्टी आपण स्वत:हून करतोय, असा आपलाच गैरसमज असतो! खरंतर Screen Play हा परमेश्वराने लिहून ठेवलेला असतो. आपण फक्त त्या बरहूकूम आपला Performance देत असतो. या सिनेमाच्या निमित्ताने हेच घडलं. हा गणपती बाप्पाचा प्रसाद अचानकच हाती पडला. मी माझ्या आगामी सिनेमाच्या तयारीत असताना, हा सिनेमा चालून आला. Blive Production तर्फे हा प्रस्ताव आला होता..आज त्याची प्रदर्शनाची तारीख जाहीर होतेय. ती सुद्धा गणपती उत्सवाच्या काळात!! हा सुद्धा गणपती बाप्पाचा प्रसाद!! प्रयत्न आहे.. आवडेल याची खात्री आहे. कारण साक्षात देव भक्ताच्या हाकेला धावून येणार आहे. गणा धाव रे…!”

‘गणा धाव रे!’ हा सिनेमा २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये भरत जाधव, प्रणाली घोगरे, भार्गवी चिरमुले, सुलभा आर्या, काजल काटे या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असतील.

अभिनेत्री प्रणाली घोगरे या सिनेमात पहिल्यांदाच मुख्य भूमिका साकारणार आहे. पोस्टर शेअर करत ती लिहिते, “प्रत्येक कलाकाराला एक तरी ड्रीम रोल हवा असतो… पण आपल्या कल्पनेच्याही पलीकडच्या गोष्टी आयुष्यात घडतात आणि आपला आपल्या बाप्पावरचा विश्वास आणखीन वाढत जातो. आज सिनेमाचं पोस्टर शेअर करताना माझ्या मनात असंख्य भावना दाटून आल्या आहेत. ज्या मी इथे मांडू शकणार नाही. गणरायाचं रूप जसं चैतन्यमय असतं. अगदी तसाच हा सिनेमा सुद्धा माझ्यासाठी ‘चैतन्य’मयी भक्ती आहे! माझ्या लाडक्या बाप्पाने मला दिलेला आशीर्वाद आहे. माझी खात्री आहे तुम्हालाही हा सिनेमा नक्की आवडेल.”

दरम्यान, मनोरंजन विश्वातील कलाकारांनी केदार शिंदेंना या नव्या सिनेमासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.