गेल्या काही महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. एका प्रामाणिक अन् कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यामुळे संपूर्ण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडून येत असल्याचं नागरिकांना पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत, अन्नपदार्थांमध्ये भेसळ करण्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे. हॉटेल्समधील अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्यामुळे तुकाराम मुंढेंनी गेल्या काही दिवसांत अनेक नामांकित हॉटेल्स तसेच उपहारगृहांचे परवाने रद्द केले आहेत. याबाबत आता सोशल मीडियावर सुद्धा चर्चा रंगू लागली आहे. नागरिकांसह अलीकडची तरुण पिढी तुकाराम मुंढेंनी केलेल्या कामाचं भरभरून कौतुक करताना दिसते.

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी सुद्धा तुकाराम मुंढेंना पाठिंबा देत, त्यांचं कौतुक केलं आहे. कारवाईच्या भीतीने अनेक चायनीज विक्रेत्यांनी आता अन्न पदार्थांमध्ये कृत्रिम रंग वापरणं बंद केलेलं आहे. अन्न पदार्थांना रंग येण्याकरीता बिट किंवा लाल मिरचीचा वापर सुरू करण्यात आला आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही तुकाराम मुंढे यांचं कौतुक करत इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे.

“आज घरी हॉटेलमधून चायनीज मागवलं…एवढंच वाटलं, “तुका” म्हणे चायनीज ऐसेची खावे…रंग नाही हो! एकदम निरमा इफेक्ट!” कॅप्शनमध्ये तुकाराम मुंढेंना टॅग करत केदार शिंदेंनी ‘Respect’ असं लिहिलं आहे.

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका युजरने आज घरी ऑर्डर केलेल्या चायनीज पदार्थाचा फोटो शेअर करा…आम्हालाही रंग पाहायचाय असं कमेंट्समध्ये उत्सुकतेपोटी म्हटलं आहे. चायनीज राइस असो किंवा Starter आता कोणत्याही पदार्थांमध्ये कृत्रिम रंगांचा वापर करण्यास मनाई आहे.

दरम्यान, केदार शिंदे यांच्यासह ईशा तलवार, देवोलिना भट्टाचार्जी यांनी देखील यापूर्वी तुकाराम मुंढेंचं कौतुक केलं आहे. केदार शिंदे यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ या सिनेमाच्या नंतर येत्या ऑक्टोबर महिन्यात त्यांचा ‘गणा धाव रे’ हा नवीन सिनेमा प्रदर्शित होणार आहे.