Nagraj Manjule Khashaba Movie Teaser : मनोरंजनसृष्टीतील आघाडीचे चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ सिनेमाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा सिनेमा दिवंगत कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जीवनावर आधारित आहे. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी कांस्यपदक पटकावलं होतं. स्वतंत्र भारतामध्ये वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकणारे पहिले भारतीय कुस्तीपटू खाशाबा दादासाहेब जाधव यांचा जीवनप्रवास या सिनेमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
खाशाबा जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला होता. नागराज मंजुळेंनी खाशाबा जाधव यांच्या भूमिकेसाठी नव्या चेहऱ्याची निवड केली आहे. या अभिनेत्याचं नाव सध्या गुलदस्त्यात ठेवलं असून, लवकरच त्याचा चेहरा रिव्हिल करण्यात येईल. सध्या ‘खाशाबा’ सिनेमाचा पहिला टीझर आणि याची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे.
एका झुंजार नायकाचा असाधारण जीवनप्रवास ‘खाशाबा’ चित्रपटाच्या निमित्ताने मांडला जाणार आहे. जिओ स्टुडिओज आणि आटपाट निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘खाशाबा’चे चित्रीकरण सुरू झाल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच नागराज मंजुळेंनी केली होती. आता या सिनेमात मुख्य भूमिका कोण साकारणार याबद्दल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
बहुप्रतीक्षित ‘खाशाबा’ सिनेमा १ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये जितेंद्र जोशी, महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, संदीप कुलकर्णी, संदेश कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, वैभव मांगले, छाया कदम, गार्गी कुलकर्णी, ओम भूतकर अशा दमदार कलाकारांची मांदियाळी असणार आहे. तसेच संभाजीराजे छत्रपती सुद्धा या सिनेमात झळकणार आहेत.
‘खाशाबा’ सिनेमाच्या टीझरवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. नागराज मंजुळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. तर, ज्योती देशपांडे आणि गार्गी कुलकर्णी यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ जानेवारी २०२७ रोजी हा सिनेमा जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल.
दरम्यान, नेटकऱ्यांनी या टीझरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी हा सिनेमा १०० कोटींच्या पार कमाई करेल असाही अंदाज वर्तवला आहे. तर, काही युजर्सनी मुख्य भूमिका साकारणार अभिनेता सैराट फेम सूरज पवार असेल, आदिनाथ कोठारे असेल असे अंदाज व्यक्त केले आहेत. मात्र, प्रत्यक्षात मुख्य अभिनेत्याची निवड नागराज मंजुळेंनी महाराष्ट्रभरात ऑडिशन घेऊन केली आहे आणि लवकरच त्याचं नाव जाहीर केलं जाईल.
