Kiran Gaikwad Instagram post for Pravin Tarde : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची व्यथा आणि स्वामी समर्थांच्या भक्तीचा अनोखा संगम असलेला ‘देऊळ बंद २’ हा सिनेमा २१ मे २०२६ ला प्रदर्शित झाला. ‘आता परीक्षा देवाची’ या टॅगलाईनसह प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळला. या चित्रपटाने दमदार कमाई करत बॉक्स ऑफिसवर एक नवा इतिहास रचला आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच आठवडे पूर्ण झाले असून सिनेमाने ९० कोटींची कमाई केली आहे. ‘देऊळ बंद २’ चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या अगदी जवळ आहे. मोजक्याच मराठी चित्रपटांना मिळालेल्या या यशानंतर अभिनेता किरण गायकवाडने सोशल मीडियावर त्याचे ‘गुरुजी’ प्रवीण तरडे यांच्यासाठी खास पोस्ट केली आहे. प्रवीण तरडे यांनी अत्यंत मेहनतीने हे यश मिळवले असून एकांकिकेपासून सुरू झालेला प्रवास हा शंभर कोटींपर्यंत पोहचल्याबद्दल किरणने आनंद व्यक्त केला आहे.
अभिनेता किरण गायकवाडने प्रवीण तरडे यांचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत भावूक पोस्ट लिहिली आहे. किरण गायकवाडने लिहिले आहे, “एकांकिका, नाटकं, मालिका रायटिंग ते थेट १०० कोटींचा सिनेमा… याला म्हणतात झपाटलेपण! आज जगाला ओरडून सांगावसं वाटतंय की, ज्या माणसाला मी खूप वर्षांपासून ओळखतो, ज्यांच्यासोबत मी ‘चौक’ सिनेमात काम केलंय, तो एक मराठमोळा दिग्दर्शक आज १०० कोटींच्या शिखरावर छातीठोकपणे उभा आहे! आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून माझे ‘गुरुजी’ प्रवीण तरडे आहेत, याचा मला लय भारी अभिमान वाटतोय.”
या सिनेमातून सिद्ध करून दाखवलंय – किरण
“मराठी सिनेमा जगात कुठेच कमी नाही आणि तो आपला झेंडा असाच गाडणार, हे गुरुजींनी ‘देऊळबंद २ आता परीक्षा देवाची’ या सिनेमातून सिद्ध करून दाखवलंय. मराठीत मोजकेच दोन-तीन सिनेमे या आकड्यापर्यंत पोहोचलेत आणि त्यात आज गुरुजींचं नाव आहे! त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम करायची इच्छा अजूनही मनात आहे, पण ‘चौक’च्या सेटवर मी त्यांची ती अफाट एनर्जी खूप जवळून पाहिलीये.”
“दिवस-रात्र न बघता सतत पळणारा, कल्पक विचार करणारा आणि कमालीच्या कष्टातून तावून सुलाखून निघालेला हा माणूस आहे. आज हे यश त्यांच्या पायाशी आलंय, कारण या माणसाने रक्ताचं पाणी केलंय! गुरुजी, तुमच्या या ऐतिहासिक यशाबद्दल मनापासून कडक अभिनंदन! “एकांकिकेच्या मातीतून जी ताकद जन्माला येते, ती थेट शंभर कोटींचा इतिहास घडवूनच शांत बसते!” मराठीची ही घोडदौड अशीच सुसाट सुरू राहो!”
सातासमुद्रापार ‘देऊळ बंद २’ चित्रपटाचा डंका
‘देऊळ बंद २’ या चित्रपटामध्ये स्नेहल तरडे, मोहन जोशी, अतुल कुडळे, प्रसाद ओक, ओम भूतकर, मंगेश देसाई, संस्कृती बालगुडे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत; तर सिनेमाचे लेखन व दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवली असून मराठी प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला आहे. फक्त भारतामध्येच नाही तर परदेशातही ‘देऊळ बंद २’ चित्रपटाचे हाऊसफुल शो होत आहेत. अमेरिका, जपान, दुबई, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल, डेन्मार्क, कॅनडा आणि सिंगापूर अशा विविध देशांमध्ये ‘देऊळ बंद २’ चित्रपट धुमाकूळ घालत असून सातासमुद्रापार मराठी चित्रपटाचा डंका वाजवत आहे.
