किशोर कदम हे ‘नटरंग’, ‘फँड्री’, ‘जोगवा’ आणि ‘दिठी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधील दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. आता त्यांच्या कारकिर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा आला आहे. संतोष डावखर दिग्दर्शित ‘गोंधळ’ या चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या विभागासाठी भारताची अधिकृत एंट्री म्हणून निवड झाली आहे.
या विशेष कामगिरीनंतर किशोर कदम यांनी ‘ETimes’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘गोंधळ’ हा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा कशामुळे ठरला, दिग्दर्शक संतोष डावखर यांची चित्रपटाबद्दलची स्पष्ट दृष्टी आणि वेगवेगळ्या भूमिका साकारण्यासाठी दिग्दर्शकांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी भाष्य केलं. विविध भूमिका साकारण्याची संधी देणाऱ्या आणि आपल्यावर सातत्याने विश्वास ठेवणाऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम करता आलं, हे आपलं भाग्य असल्याचंही किशोर कदम यांनी म्हटलं.
कशी मिळाली ‘गोंधळ’ची ऑस्करसाठी निवड झाल्याची बातमी
किशोर कदम यांनी सांगितलं की, ‘गोंधळ’ या चित्रपटाची भारताची अधिकृत ऑस्कर एंट्री म्हणून निवड झाल्याची बातमी त्यांना पहिल्यांदा मुंबईतील बीएमसी कार्यालयात असताना मिळाली. ते त्यांच्या सोसायटीशी संबंधित कामासाठी बीएमसी कार्यालयात गेले होते. याबद्दल आठवण सांगताना किशोर कदम म्हणाले, “मी बीएमसीच्या कार्यालयात होतो. तेव्हा मला व्हॉट्सअॅपवर कॉल आला. एका चॅनेलकडून मला फोन आला आणि त्यांच्याकडूनच आमच्या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड झाल्याचं समजलं. तिथे उपस्थित असलेल्या बीएमसीमधील सगळ्या लोकांनीही ते ऐकलं. त्यानंतर आणखी दोन-तीन चॅनेल्सचे फोन आले.” ही बातमी काही वेळातच बीएमसी कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. किशोर कदम पुढे म्हणाले, “फोनवर बोलल्यानंतर बीएमसी कमिशनरही केबिनमध्ये आले. कार्यालयातच माझा सत्कार करण्यात आला.”
किशोर कदम यांच्या मते, ‘गोंधळ’ हा त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा चित्रपट आहे. आतापर्यंत त्यांनी अनेक नामवंत दिग्दर्शकांबरोबर काम केलं असून, विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. दिग्दर्शकांनी आपल्यावर विश्वास ठेवून वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका दिल्यामुळेच आपल्या फिल्मी कारकिर्दीत इतकी विविधता असल्याचं ते मानतात. याबद्दल बोलताना किशोर कदम म्हणाले, “मी स्वतःला खूप नशीबवान अभिनेता मानतो. कारण ज्या दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, त्यामध्ये नटरंगसाठी रवी जाधव, फँड्रीसाठी नागराज मंजुळे, स्पेशल २६साठी नीरज पांडे, श्याम बेनेगल, अतुल पेठे, सुमित्रा भावे, अमोल पालेकर, सुधीर मिश्रा आणि असे अनेक दिग्दर्शक आहेत. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला चांगल्या भूमिका दिल्या.”
ते पुढे म्हणाले, “नाहीतर फँड्रीमधील भूमिका मला कोणी दिली असती? नटरंगमध्ये रवी जाधव यांनी मला कॉन्ट्रॅक्टरची भूमिका दिली नसती तर ती भूमिका मला दुसरं कोण देणार होतं? जोगवामध्येही मी साकारलेली भूमिका वेगळी होती.” आपल्या विविध भूमिकांबद्दल बोलताना त्यांनी ‘दिठी’ या चित्रपटाचाही उल्लेख केला. या चित्रपटात मोहन आगाशे आणि सुमित्रा भावे यांच्याबरोबर काम केल्याचं सांगत ते म्हणाले, “दिठी हा मोहन आगाशे यांचा चित्रपट होता आणि सुमित्रा भावे दिग्दर्शिका होत्या. त्यांच्याबरोबर मी चार-पाच चित्रपट केले आणि प्रत्येक भूमिका वेगळी होती.”
‘गोंधळ’ची पटकथा अतिशय बारकाईने विणलेली होती – किशोर कदम
किशोर कदम यांनी सांगितलं की, ‘गोंधळ’ या चित्रपटातील सर्वात जास्त भावलेली गोष्ट म्हणजे त्याची पटकथा आणि दिग्दर्शक संतोष डावखर यांची सिनेमाबद्दलची समज. याबद्दल बोलताना किशोर कदम म्हणाले, “संतोष डावखर अनेक वर्षांपासून माझं काम पाहत होते, जरी आमची एकमेकांशी ओळख नसली तरी. त्यांनी मला भेटण्यासाठी फोन केला आणि गोंधळबद्दल सांगितलं. त्यावेळी मी खूप प्रभावित झालो, कारण त्या चित्रपटाची पटकथा अतिशय बारकाईने विणलेली होती.” ते पुढे म्हणाले, “ती पटकथा वाचताना माझ्या लक्षात आलं की या व्यक्तीला जागतिक सिनेमाची चांगली जाण आहे. त्यांनी जागतिक सिनेमा पाहिला आहे, पटकथांचा अभ्यास केला आहे, वर्कशॉप्स केले आहेत आणि या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आहेत. मला ही भूमिका मिळाली हे माझं भाग्यच आहे.”
किशोर कदम यांच्यासाठी या चित्रपटातील सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक म्हणजे ‘गोंधळ’चा सुरुवातीचा सीन होता. चित्रपटातील पहिलाच शॉट तब्बल २५ ते २७ मिनिटांचा असून तो एकाच टेकमध्ये शूट करण्यात आला आहे. याबद्दल किशोर कदम म्हणाले, “विशेषतः पहिला शॉट २५-२७ मिनिटांचा आहे आणि तो एकाच शॉटमध्ये आहे. एक अभिनेता म्हणून दिग्दर्शकाने माझ्यावर दाखवलेला विश्वास हे माझ्यासाठी आव्हानात्मकही होतं आणि आनंददायीही. मी तो सीन चांगला करण्याचा प्रयत्न केला. पण मी तो कसा केला, हे प्रेक्षक ठरवतील.” आता ‘गोंधळ’हा चित्रपट मराठीबरोबरच हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमधून महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. सिनेमाला भाषेची सीमा नसते, हे या चित्रपटाच्या प्रवासातून दिसून येत असल्याचं किशोर कदम यांनी म्हटलं.
ते म्हणाले, “मला असं वाटतं की सिनेमाच्या भाषेत भाषा नावाची कोणतीही गोष्ट नसते. दक्षिण भारतीय भाषा, तमिळ, तेलुगू, कन्नड, तुळू आणि आता मराठीही महाराष्ट्रातील लोकांपर्यंत, कोलकात्यातील लोकांपर्यंत आणि बंगाली प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. चांगला सिनेमा अनेक भाषांमध्ये लोकांपर्यंत पोहोचतो, ही खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण त्यामुळे अधिकाधिक लोक तो पाहू शकतात.”
कांताराचं उदाहरण देत काय म्हणाले?
‘कांतारा’च्या यशाचं उदाहरण देताना किशोर कदम म्हणाले, “कांतारामध्ये ज्या पद्धतीने तिथली माणसं आणि लोकपरंपरा राष्ट्रीय स्तरावर पोहोचल्या, त्याचप्रमाणे गोंधळही राष्ट्रीय स्तरावर पोहोचेल, असं मला वाटतं.” किशोर कदम यांनी चित्रपट बनवताना दिग्दर्शक संतोष डावखर यांच्या स्पष्ट आणि कोणतीही तडजोड न करण्याच्या भूमिकेबद्दलही सांगितलं. त्यांच्या मते, दिग्दर्शकाला चित्रपटाबद्दल नेमकं काय करायचं आहे, याची स्पष्टता असेल तर संपूर्ण टीम त्याच उद्देशाने काम करते. याबद्दल ते म्हणाले, “मला वाटतं, एखादं काम करताना पॅशन खूप महत्त्वाचं असतं. कारण चित्रपट बनवणं आणि नाटक उभं करणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. चित्रपटासाठी खूप पैसा, अनेक लोक आणि खूप मेहनत लागते. दिग्दर्शक हा सगळ्यांना नियंत्रित करणारा कॅप्टन ऑफ द शिप असतो.” ते पुढे म्हणाले, “त्याला काय करायचं आहे, हेच माहीत नसेल तर त्याचा सगळ्या गोष्टींवरचा ताबा सुटतो. पण इथे तसं काही झालं नाही. दिग्दर्शकाच्या मनात त्याला नेमकं काय हवं आहे, याबद्दल खूप स्पष्टता होती. त्यांनी या चित्रपटासाठी अनेक वर्षांपासून तयारी केली असावी.”
दिग्दर्शकाच्या तयारीचं महत्त्व सांगताना किशोर कदम यांनी दिग्दर्शक रिचर्ड अॅटनबरो यांच्याशी संबंधित एक किस्साही सांगितला. ‘गांधी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा हा किस्सा असल्याचं त्यांनी सांगितलं. किशोर कदम म्हणाले, “गांधीच्या शूटिंगदरम्यान रिचर्ड अॅटनबरो यांच्याबद्दल मी कुठेतरी वाचलं होतं. एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं, तुम्ही चित्रपटाचं दिग्दर्शन करत नाही आहात. फक्त इथे बसून झोपत आहात. त्यावर त्यांनी उत्तर दिलं, नाही, मी चित्रपटाचं दिग्दर्शन कागदावरच करून ठेवलं आहे. माझं काम मी आधीच केलं आहे. आता ते प्रत्यक्षात साकारण्याचं काम तंत्रज्ञांचं आहे.” किशोर कदम यांनी पुढे सांगितलं, “त्याचप्रमाणे आमचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनाही नेमकं काय हवं आहे, याची खूप स्पष्टता होती. त्यांना काय करायचं आहे, हे त्यांना माहीत होतं.”
