Kishori Shahane Son Bobby On Nepotism : बॉलीवूडमधील नेपोटिझम (घराणेशाही)चा मुद्दा काही नवीन नाही. गेल्या अनेक वर्षांपासून घराणेशाही हा चर्चेचा विषय ठरत आला आहे. ८०-९० च्या दशकामध्ये अनेक दिग्गजांनी आपल्या मुलांना चित्रपटसृष्टीमध्ये आणलं. यापैकी काही स्टारकिड्सना चित्रपटसृष्टीमध्ये त्यांचे वेगळे स्थान निर्माण करण्यात यश मिळालं. तर काहींच्या पदरी मात्र अपयश आले. चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणे सोपे आहे पण तिथे जागा टिकवून ठेवणे मात्र त्याहून कठीण. यामुळे अनेक स्टारकिड्सना घराणेशाहीवरुन टीका व ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. घराणेशाहीच्या टीका व ट्रोलिंगवर अनेक स्टारकिड्सनी वेळोवेळी त्यांची मतं व्यक्त केली आहेत.
अशातच बॉलीवूडसह मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या किशोरी शहाणे यांच्या मुलानेही घराणेशाहीवर त्याचं मत व्यक्त केलं आहे. किशोरी शहाणेंचा मुलगा बॉबी हा सुद्धा याच क्षेत्रात कार्यरत आहे. लोकमत फिल्मीशी बोलताना त्याने याबद्दल असं म्हटलं की, “मी याबद्दल कधीच विचार केला नाही. पण तरी आपण असं म्हटलं की, नेपोटिझम (घराणेशाही) आहे आणि मला त्यामुळे फायदा होईल; तर मी लहानपणापासून एवढं सगळं काम केलं नसतं. मला कायम हेच वाटायचं की, जे काही करायचं आहे ते मला स्वत:ला करायचं आहे.”
यापुढे तो म्हणाला की, “माझे आई-बाबा आहेत. मला त्यांचा खूप पाठींबा आहे आणि ते खूपच महत्त्वाचं आहे. काही लोकांकडे असं असतं की, आई-वडिलांना या क्षेत्राबद्दल काही कल्पनाच नसते. अभिनय हे क्षेत्र नेमकं काय आहे? त्या दृष्टीकोनातून विचार केला तर त्यांच्याकडून पाठींबा किंवा मार्गदर्शन मिळालं आहे. याबद्दल ते मला म्हणतात की, आम्ही समजतो तू या क्षेत्रात आहेस; पण तरी तुझा एक वेगळा प्रवास आहे; जो तुला एकट्यानेच करायचा आहे.”
यानंतर त्याने असं म्हटलं की, “घराणेशाही म्हणजे काय तर, आई-बाबांनी यापूर्वी काम केलं आहे आणि त्यांचा मुलगा त्याच क्षेत्रात आहे. मग हे प्रत्येकच क्षेत्रात होत असतं. व्यावसायिकाचा मुलगा व्यावसायिक होतो. वकिलाचा मुलगा वकील होतो. शेवटी तो प्रभाव पडतोच. त्या मुलावर आई-वडिलांचे संस्कार असतात. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना बघूनच काही गोष्टी शिकत असता. त्यांना बघूनच तुम्ही प्रेरणा घेत असता. तर हाच एक फायदा आहे जो मला मिळाला आहे. पण मला हे नको आहे. मला माझा स्वत:चा प्रवास करायचा आहे आणि मला इतके मदत करणारे आई-वडील मिळाल्याचा आनंद आहे. फक्त हीच एक गोष्ट आहे.”
दरम्यान, बॉबीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, त्याने ‘शिर्डी साईबाबा’ या चित्रपटात काम केलं आहे. शिवाय काही चित्रपटांसाठी त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. यासह त्याने एडिंटिंग, कास्टिंग, साऊंड रेकॉर्डिंग रुम, डबिंग स्टुडिओमध्ये सहाय्यक म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर त्याने कलर्स आणि झी मराठी वाहिन्यांवरील पुरस्कार सोहळ्यात देखील डान्सर म्हणून काम केलं आहे. त्यामुळे आता बॉबी कोणत्या नवीन चित्रपटामधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणार? याची सर्वांना उत्सुकता आहे.