नवरात्र म्हणजे रंग, संगीत, ताल आणि गरब्याच्या ठेक्यावर थिरकण्याचा उत्सव! याच उत्सवी वातावरणाची रंगत वाढवणारं ‘मैत्रेया’ या आगामी चित्रपटातील ‘निघाली राधा सोडूनी गोकुळा’ हे नवं गरबा गीत नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेल्या या गाण्यात समर, आयुषी, स्काय आणि रूची यांची खास नृत्य अदाकारी पाहायला मिळत आहे. रंगीबेरंगी वातावरण, ताल धरायला लावणारं संगीत, आकर्षक नृत्य आणि उत्साहाने भरलेला फेस्टिव्ह मूड यामुळे हे गाणं नवरात्रीच्या जल्लोषात रंग भरणार आहे. दरम्यान, ‘मैत्रेया’च्या प्रदर्शनाची नवीन तारीखही जाहीर करण्यात आली असून, हा चित्रपट आता २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ओंकार मंगेश यांनी लिहिलेल्या या गाण्याला पंकज पडघण यांनी संगीत दिलं असून, आदर्श शिंदे आणि वैशाली सामंत यांच्या दमदार आवाजात हे गाणं स्वरबद्ध झालं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि ठेका यांचा सुंदर मेळ साधत त्यात पारंपरिक गरब्याची झलक आणि आजच्या तरुणाईला आवडेल असा फ्रेश अंदाज पाहायला मिळतो. तसेच सुजित कुमार यांच्या कोरिओग्राफीने गाण्यातील गरब्याच्या तालाला अधिकच आकर्षक रूप दिलं आहे. नवरात्रीच्या दिवसांत मित्रमैत्रिणींसह गरबा खेळण्याची तयारी करणाऱ्या तरुणाईला हे गाणं नक्कीच आपलंसं वाटेल.

दिग्दर्शिका क्रांती रेडकर याबद्दल सांगते, “नवरात्र हा रंग आणि उत्साहाचा सण आहे. त्यामुळे ‘मैत्रेया’च्या या गाण्यात तोच उत्साह अगदी मनापासून दिसावा, अशी आमची इच्छा होती. गाण्याचे शब्द, संगीत आणि कलाकारांचा उत्साह यामुळे एक सुंदर फेस्टिव्ह वातावरण तयार झालं आहे. सुजित कुमार यांनी केलेली कोरिओग्राफी खूप एनर्जेटिक आहे. नवरात्रीत हे गाणं प्रेक्षकांना ठेका धरायला लावेल, अशी आशा आहे. त्याचबरोबर आता ‘मैत्रेया’च्या प्रदर्शनाची नवी तारीखही जाहीर झाली असून २० नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे या उत्सवी गाण्यासह चित्रपटाच्या प्रदर्शनाचीही उत्सुकता वाढली आहे.”

समर टाईम्स प्रॉडक्शन प्रस्तुत या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडेने केलं असून, मनोज खळतकर या चित्रपटाचे निर्माते आहेत, तर अमन खळतकर सहनिर्माते आहेत. समर, आयुषी, स्काय आणि रूची यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मैत्रेया’ २० नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.