Kranti Redkar Once Shared Accident Story On Jatra Shoot : मराठी सिनेसृष्टीत अनेक चित्रपट होऊन गेले, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली. त्यापैकीच एक चित्रपट म्हणजे ‘जत्रा’. केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटात मोठी स्टार कास्ट पाहायला मिळाली होती.
भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, कुशल बद्रिके, संजय खापरे, रमेश वाणी, क्रांती रेडकर, प्रिया बेर्डे, विजय चव्हाण, विजू खोटे यांसारख्या कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाने या चित्रपटात आणखीनच रंगत आणली.
‘जत्रा’ सिनेमाच्या सेटवर अनेक गमतीजमती झाल्या होत्या. मात्र, एक घटना अशी घडली होती; ज्यामुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. याबद्दल स्वत: क्रांती रेडकर अन् दिग्दर्शक केदार शिंदे यांनी एका मुलाखातीत काळजाचा ठोका चुकवणारी आठवण सांगितली होती. तेव्हा नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊ…
‘जत्रा’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी अचानक पाऊस सुरू झाल्याने केदार शिंदेंनी शूटिंग थांबवलं. त्यानंतर टीममधील काहीजण पाचगणीला जात होते. ज्यात क्रांती रेडकरसुद्धा होती. पण केदार शिंदेंनी तिला निरोप देत जाऊ नये असं म्हटलं होतं आणि त्यामुळेच मोठा अनर्थ टळला होता.
स्वामींचीच कृपा असेल की… – केदार शिंदे
लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे म्हणाले होते, “अचानक पाऊस पडल्याने आम्ही पॅकअप केलं. त्या दुपारी काही जणांना असं वाटलं की, पाचगणी जाऊन मज्जा करावी. त्यात क्रांती रेडकर होती. मला कसंही करून तिला जाण्यापासून थांबवायचं होतं. मग घाटात क्रांती पुढच्या गाडीतून उतरली आणि मागच्या गाडीत येऊन बसली आणि ती गाडी यूटर्न मारून पुन्हा आली आणि नंतर त्या पुढच्या गाडीचा अपघात झाला. मी क्रांतीला जाण्यापासून अडवावं हे तेव्हा मला कसं सुचलं माहीत नाही. स्वामींचीच कृपा असेल की, मी तिला निरोप पोहोचवला आणि ती त्या गाडीतून उतरली.”
“चेहऱ्याला ६२ टाके पडले” – क्रांती रेडकर
पुढे क्रांतीने सांगितलं होतं की, “त्या अपघातानंतर माझं अभिनेत्री म्हणून करिअरच संपलं असतं. कारण संपूर्ण चेहऱ्याला जखमा झाल्या होत्या. माझ्या सीटवर जो बसला होता. त्याच्या संपूर्ण चेहऱ्याला ६२ टाके पडले आणि त्याचे सगळे दात घशात गेले होते. तो मुलगा मागच्या गाडीत होता, तो येऊन म्हणाला की तुला मागच्या गाडीत बसायला बोलावलंय. मी उतरल्यानंतर तो माझ्या जागेवर जाऊन बसला होता. त्यानंतर जेव्हा तो शुद्धीत आला तेव्हा त्याने क्रांती कशी आहे? असं विचारलं होतं. मी त्या गाडीतून उतरले होते, हे तो विसरला होता.”
