एनसीबीचे माजी संचालक समीर वानखेडे यांच्या मुंबईतील निवासस्थानी काही वर्षांपूर्वी सीबीआयच्या पथकाने छापा टाकला होता. समीर वानखेडे हे एनसीबी मुंबईचे माजी प्रमुख होते. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतपासून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानपर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींची प्रकरणं वानखेडे यांच्या कार्यकाळात समोर आली होती. याबाबत त्यांची पत्नी क्रांती रेडकरनेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

समीर वानखेडेंनी लग्नाआधीच या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती, असं क्रांतीने ‘आरपार’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, “समीर खूप चांगला नवरा आहे, तो खूप चांगला बाबा आहे आणि त्यापेक्षाही तो खूप चांगला माणूस आहे. त्याने मला लग्न करताना दहा वेळा सांगितलं होतं, तू एका इमानदार ऑफिसरशी लग्न करते आहेस. त्यामुळे भविष्यात बरंच काही होऊ शकतं. आपल्याला कशातही गोवलं जाऊ शकतं. आपल्या घरात कधी चौकशी होऊ शकते, कधी रेड होईल तर तू यासाठी तयारीत राहा. आजही तो प्रत्येक गोष्टीचं बिल सांभाळून ठेवतो. तो नेहमी नियमाने वागणारा माणूस आहे. मला याचा का त्रास होईल? मी हे सगळं आता स्वीकारलंय. याशिवाय मलाही आवडतं त्याची बायको म्हणून मिरवायला. समाजात मान आहे, रुबाब आहे.”

Kranti Redkar, Sameer Wankhede
समीर वानखेडे व क्रांती रेडकर

आमच्या घरात १७ तास रेड चालू होती…

क्रांती पुढे म्हणाली, “आमच्या घरात १७ तास रेड चालू होती. या सगळ्या बाबतीत मी खूप धीट आहे…मी अशी पटकन घाबरत वगैरे नाही. मानसिकरित्या मी खूप स्ट्राँग आहे…त्यात आम्हाला कुणालाही फोन करण्यास परवानगी नव्हती. बरं जेव्हा रेड सुरू झाली तेव्हा समीर घरातही नव्हता. मी आणि माझ्या मुलीच घरात होतो. मी शांतपणे त्यांना सांगितलं… हे माझं घर, ही माझ्या कपाटाची किल्ली, तुम्हाला जे बघायचंय ते बघा आणि न्यायचंय ते न्या. फक्त माझे घरखर्चाचे १७ की १३ हजार रुपये होते.. हे फक्त बघा. नाहीतर ते सुद्धा न्यायचे आहेत तर घेऊन जा. त्यांनी संपूर्ण घर शोधलं, काय झालं? काय मिळालं? आपण काही केलं नाही ना? तर आपण घाबरायचं नाही. त्यांना मनाची शांती करुदेत… आपण नेहमी सिस्टीमला सहकार्य करायचं. आम्ही सुद्धा तेच केलं.”

Kranti Redkar, Sameer Wankhede
समीर वानखेडे व क्रांती रेडकर

“खरं सांगायचं झालं तर, मला रडायला अजिबात आवडत नाही. मी अशी छोट्या-छोट्या गोष्टींवरून भावुक होते. आता या छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे…उदा. एखाद्याला जेवण, अन्न मिळत नसेल तर मला वाईट वाटेल. पण, आमच्यासाठी हा लढा आहे. माणूस रडतो केव्हा, जेव्हा तो हरतो. आम्ही अजूनही लढतोय.. बरं माझा नवरा पण फायटर आहे. ताठ मानेने सगळ्याला सामोरा जातो…त्यामुळे मलाही त्याच्याकडूनच प्रेरणा मिळतेय.” असं क्रांतीने सांगितलं.