क्रांती रेडकरने नुकतंच तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगितलं. यावेळी तिने नाना पाटेकरांचाही एक किस्सा सांगितला आहे. नाना पाटेकरांनी तिला वाईट अभिनय केल्यामुळे फोनवरच ऐकवलं होतं असं तिने म्हटलं आहे.

क्रांतीने सांगितला नाना पाटेकरांचा किस्सा

‘कलाकृती मीडिया’ला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने याबद्दल सांगितलं आहे. एका ऑडिशनचा किस्सा सांगताना क्रांती म्हणाली, “नानांबद्दल मला एक गोष्ट सांगायला आवडेल. त्यांनी मला एका ऑडिशनला पाठवलं होतं. एकदा आजिवासन स्टुडिओला आम्ही तू तू मैं मैं नाटक रेकॉर्ड करत होतो. तिथे नाना पाटेकर पहिल्यांदा भेटले आणि ते मला बघता क्षणी म्हणाले की एका सिनेमांच ऑडिशन सुरू आहे आणि मला असं वाटतं की त्यांना अशीच तुझ्यासारखी सावळी मुलगी हवीये तू जा आणि ऑडिशन दे. तिथे काही माझी निवड झाली नाही.”

क्रांती रेडकर याबद्दल पुढे म्हणाली, “त्यानी माझं आमच्यासारखे आम्हीच मालिकेतील काम पाहिलं. तेव्हा मी खूप वाईट काम करायचे. त्यांनी मला फोन केला आण सांगितलं आता मला कळलं तुझी निवड का झाली नाही. तू वाईट काम करते. किती ओव्हरअॅक्टिंग करते, काय चाललंय तुझं. मी म्हटलं सॉरी नाना. ते म्हणाले, नाही नाही बाळा कमी अॅक्टिंग कर. अशाप्रकारे ही सगळी मंडळी मला काही न काही शिकवत गेली.” क्रांतीने पुढे दिलीप प्रभावळकर यांनीही तिला ‘तू तू मैं मैं’ नाटक पाहिल्यानंतर त्यांना तिचा अभिनय आवडला नव्हता असा अभिप्राय त्यांनी दिला होता असा किस्साही सांगितला.

दरम्यान, क्रांती सध्या तिच्या ‘मैत्रेया’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून यामध्ये सर्व तरुण कलाकारांना तिने संधी दिली आहे. येत्या २० नोव्हेंबरला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.